Fact check: रुद्राक्षाची माळ घातली म्हणून ख्रिश्चन शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण, काय आहे व्हायरल दाव्याचं सत्य?

Update: 2021-10-19 07:24 GMT

सुदर्शन न्यूजने 16 ऑक्टोबरला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ मध्ये एक माणूस एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, तमिळनाडूतील एका ख्रिश्चन शिक्षकाने एका हिंदू विद्यार्थ्याला रुद्राक्ष घातल्याने मारहाण केल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुदर्शन न्यूजने हे ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्वीट हजारो लोकांनी रिट्विट केलं आहे.

सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक सुरेश चव्हाण यांनीही हा व्हिडीओ याच दाव्यासह ट्विट केला आहे. त्यांच्या ट्विटला सुद्धा आतापर्यंत ४ हजारांपेक्षाही जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे.

फेसबुकवर सुद्धा याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

काय आहे सत्य...?

कीवर्ड सर्चवर केले असता अल्ट न्यूजला आढळलं की, हा व्हिडिओ तामिळनाडूतील चिदंबरम गावातील घटनेशी संबंधित आहे.

काय आहे प्रकरण.

नंदनर सरकारी बॉईज उच्च माध्यमिक शाळेतील बारावीच्या दलित विद्यार्थ्याला एका शिक्षकाने मारहाण केली होती. वर्गात बसलेल्या इतर विद्यार्थ्यांनी ही संपूर्ण घटना मोबाईलवर रेकॉर्ड केली. आणि त्यामुळे, ही बाब समोर आली.

15 ऑक्टोबर रोजी 'द हिंदू'ने पोलिसांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की, मुख्याध्यापक शाळेच्या फेऱ्या करत होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की, विद्यार्थी वर्गात जात नाहीत. मुख्याध्यापकाने मुलाला वर्गात नेलं आणि भौतिकशास्त्राचे शिक्षक सुब्रमनियन यांच्याकडे तक्रार केली. आणि याच कारणामुळे सुब्रमनियन यांनी या 17 वर्षांच्या मुलाला मारहाण केली. मुलाच्या मांडीवर जखमा होत्या. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

द फ्री प्रेस जर्नल, एएनआयने दिलेल्या अहवालात विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाची ओळख सुब्रमनियन अशी करण्यात आली आहे.

दरम्यान, तामिळनाडूमध्ये एका ख्रिश्चन शिक्षकाने रुद्राक्ष परिधान केल्यामुळे एका हिंदू विद्यार्थ्याला मारहाण केली होती. याचा शोध घेतला असता, द हिंदू तामिळने १६ ऑक्टोबर रोजी वृत्त दिलं आहे की, कांचीपुरममधील एका ख्रिश्चन शिक्षकाने रुद्राक्ष परिधान केल्यामुळे एका विद्यार्थ्याला वर्गात जाण्यापासून अडवलं होतं. अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की, शिक्षकाने उजव्या हातावर विद्यार्थ्याला मारहाण केली.

यासोबत, एबीपी तामिळच्या अहवालात शाळेतील शिक्षकांचा हवाला देत असंही सांगण्यात आलं आहे की, शाळेत हार, कानातले घालण्यास मनाई आहे. दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणाची योग्य चौकशी कारण्याबद्दलही भाष्य केलं आहे. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र या प्रकरणाबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.

निष्कर्ष:

एकूणच, तामिळनाडूमध्ये एका विद्यार्थ्याला वर्गात उपस्थित नसल्याबद्दल शिक्षकाने मारहाण केली. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सुदर्शन न्यूजने तामिळनाडूतील दुसऱ्या घटनेशी जोडून शेअर केला आहे.



या संदर्भात Alt news ने फॅक्ट चेक केलं आहे. 

Tags:    

Similar News