Fact Check | औरंगाबादेतील बेकरी कामगारांना कोरोना झाल्याची अफवाच!

Update: 2020-04-30 09:39 GMT

राज्यातील कोरोनाबधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतंच आहे. औरंगाबाद शहरात गेल्या ३ दिवसांत तब्बल १०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ही आकडेवारी बघता येत्या काही दिवसांत बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एकीकडे अशी परिस्थिती असताना शहरात मोठ्या प्रमाणात अफवांचं पेव पसरलं आहे. ३ दिवसांत अचानक बधितांची संख्या वाढल्याने शहरात भीतीचं वातावरण आहे. त्यातच अनेकजण कोरोनाचे रुग्ण वाढल्याची आकडेवारी, माहिती व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करत आहेत. या माहितीला अधिकृत स्रोत नाही. त्यामुळे घबराट पसरत आहे.

या आकडेवारीसोबत दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरातील छावणी भागात असलेल्या प्रसिद्ध डिलक्स बेकरीतील २ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यासोबतच छावणी परिसरातून आणि बेकरीतून काही समान घेऊ नका अशा आशयाचे मेसेजही व्हायरल आहेत.

हे आहे वास्तव

वरील मेसेज मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर प्रशासनाकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. छावणी परिषदेच्या हद्दीत अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. डिलक्स बेकरीत कामगारांना कोरोना झाल्याची बातमी निराधार असल्याची माहिती छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी दिलीय.

Similar News