Fact Check | फळांवर थुंकी लावणाऱ्या 'त्या' व्हिडीओचं सत्य

Update: 2020-04-05 02:21 GMT

देशात जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यापेक्षा जास्त गतीने अफवा पसरवल्या जात आहेत. दिल्लीतील निजामुद्दीन मरकजचं प्रकरण पुढे आल्यापासून मुस्लीम समाज कोरोना पसरवत असल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल आहेत.

असाच एका मुस्लीम फळविक्रेत्याचा व्हिडीओ सध्या फेसबुक, ट्विटरसह व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुस्लीम फळविक्रेता फळांवर थुंकी लावताना दिसत आहे. या व्यक्तीला कोरोना असून ग्राहकांना लागण व्हावी या उद्देशानं तो फळांवर थुंकत आहे असा दावा या व्हिडीओबाबत करण्यात येतोय.

https://twitter.com/Imamofpeace/status/1245999063385817090?s=19

https://twitter.com/ShefVaidya/status/1246054018910048257?s=19)

https://twitter.com/adarshhgd/status/1245982049019691008?s=19

 

विशेष म्हणजे, आतापर्यंत या आशयाचे जेवढे व्हिडीओ आणि पोस्ट्स व्हायरल झाल्या आहेत, त्यापैकी हा व्हिडीओ सर्वात जास्त वेळा फॉरवर्ड झाला आहे.

तथ्य पडताळणी :

हा व्हिडीओ आणि या फळविक्रेत्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता हा व्यक्ती मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील असल्याचं समोर आलं. व्हिडीओतील व्यक्तीचं नाव शेरू खान असून तो रायसेन शहरातील मुख्य बाजारपेठेत फळविक्री करतो.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शेरू खानविरोधात ३ एप्रिल २०२० रोजी भादंवि २६९ आणि २७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै भास्करने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केलं आहे.

३ एप्रिलला दाखल झालेल्या FIR नुसार ही घटना १६ फेब्रुवारी रोजी घडलेली आहे. तक्रारदार बोधराज टिपटा आपल्या मित्राच्या पानच्या दुकानात बसले असताना त्यांना शेरू खान फळांवर थुंकी लावत असताना दिसला आणि त्यांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. अशाप्रकारचे एखाद्या रोगाचं संक्रमण होऊ शकतं असं वाटल्याने तक्रार केल्याचं टिपटा यांनी सांगितलं.

शेरू खान याच्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलांचं मानसिक आरोग्य ठीक नाही. त्यांना नोटा मोजल्याप्रमाणे फळांना हात लावायची सवय आहे. मात्र, या दाव्याची सत्यता समोर येऊ शकली नाही.

दुसरीकडे रायसेनच्या पोलीस अधीक्षक मोनिका शुक्ला यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की, हा व्हिडीओ जुना असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. रायसेन जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबधित रुग्ण आढळलेला नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ १६ फेब्रुवारीचा आहे. देशात पहिला कोरोनाबधित रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. त्यानंतर १४ मार्चला सरकारने कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं. मध्य प्रदेशात पहिला कोरोनाबधित रुग्ण २० मार्चला समोर आला होता. त्यामुळे ही घटना आणि कोरोना यांचा संबंध दिसत नाही.

निष्कर्ष :

या फळविक्रेत्याचं वर्तन निश्चितपणे चुकीचं आणि इतरांच्या आरोग्याला धोकादायक असंच आहे. मात्र, हा फळविक्रेता कोरोनाबधित आहे आणि तो ग्राहकांना कोरोना होण्याच्या उद्देशाने फळांना थुंकी लावत असल्याच्या दाव्यात तथ्य नाही.

Similar News