Fact Check : मध्यप्रदेशमधील खंडवा जिल्ह्यात मुस्लिम तरुणाने हिंदू साधूची दाढी आणि केस कापून मारहाण केली आहे का?

Update: 2022-06-02 10:27 GMT

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एका हिंदू साधुला मुस्लिम तरुणाने मारहाण करून साधूची दाडी आणि केस कापल्याचा दावा करत व्हिडीओ शेअर केला जात आहे. पण मुस्लिम तरुणाने हिंदू साधुची दाडी आणि केस कापून साधुला मारहाण केली आहे का? हे जाणून घेण्यासाठी वाचा...

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात एक तरुण एका साधूला शिव्या देत साधुची दाडी आणि केस कापत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर हा व्हिडीओ शेअर करतांना एका मुस्लिम युवकाने साधुसोबत गैरव्यवहार केला असल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये ट्वीटर वापरकर्ते महेश साहू यांनी याच दाव्यासह ट्वीट केले आहे. याबरोबरच हिंदू एक्टमध्ये शिक्षा देण्याची मागणी केली आहे. (अर्काइव्ह लिंक)

याच दाव्यासह ट्वीटर वापरकर्ते डॉ. तरुण गुप्ता यांनीही ट्वीट केले आहे. तसेच अनेक ट्वीटर वापरकर्त्यांनी ट्वीट करुन हाच दावा केला आहे.

हा दावा फक्त ट्वीटरवरच नाही तर फेसबुकवरही त्याच सांप्रदायिक दाव्यासह शेअर करण्यात आला आहे.


 



पडताळणी :

अल्ट न्यूजने व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर या व्हिडीओवर पृथ्वी चक्र नावाचा लोगो पहायला मिळाला. त्यामुळे या लोगोच्या संदर्भाने अल्ट न्यूजने काही किवर्ड सर्च केले. त्यात असे आढळून आले की, पृथ्वी चक्र नावाच्या चॅनलने हा व्हिडीओ फेसबुकवर 24 मे 2022 रोजी पोस्ट केला होता. तर या पोस्टमधील माहितीनुसार मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील प्रविण नावाच्या एका व्यक्तीने साधुला मारहाण केली होती.


 



या व्हिडीओतून समोर आलेल्या माहितीची खात्री पटण्यासाठी अल्ट न्यूजने आणखी काही की-वर्ड्स गुगलवर सर्च केले. त्यामध्ये विविध माध्यमसमूहांनी या घटनेचे वृत्तांकन केले असल्याचे आढळले. याबरोबरच नवभारत टाइम्सने या घटनेचे वृत्तांकन करताना म्हटले आहे की, खंडवा जिल्ह्यातील पतजन गावात प्रवीण नावाच्या तरुणाने केस कर्तनालयाच्या दुकानासमोर एका साधुची दाडी आणि केस कापले. तसेच या वृत्तात पुढे म्हटले आहे, प्रवीण एका हॉटेल मालकाचा मुलगा असून त्याने हे कृत्य नशेत असताना केले आहे. याबरोबरच या घटनेमागचे मुख्य कारण समोर आले नसल्याचे वृत्तात म्हटले आहे.

या घटनेवर आज तकनेही लेख लिहीला आहे. त्यामध्ये आरोपी तरुणाचे नाव प्रवीण गौर असल्याचे म्हटले आहे. तर त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असल्याचेही आज तकने म्हटले आहे. याबरोबरच खंडवा जिल्ह्याचे पोलिस अधिकारी विविक सिंह यांचा हवाला देत आज तकने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या प्रकरणात केस दाखल करण्यात आली असून योग्य कारवाई सुरू आहे.




 


अल्ट न्यूजने खंडवाचे ठाणे प्रभारी पी आर डावर यांच्याशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा सांप्रदायिक अँगल नाही. तसेच त्यांनी सांगितले की, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे साधुसोबत अशा प्रकारे गैरप्रकार झाल्याबद्दल लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात केस दाखल करून आरोपीला अटक केली. दरम्यान साधूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र साधू कुठे गेले ते आढळून आले नाही. मात्र अटक केलेल्या तरुणाची चौकशी केल्यानंतर तो मुस्लिम समुदायातील नसून हिंदू समुदायातीलच असल्याचे आढळून आले. सध्या अटक केलेला तरुण पोलिस कोठडीत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

निष्कर्ष –

माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातम्या आणि पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती यावरून हे स्पष्ट होत आहे की, मध्य प्रदेशमधील खंडवा येथे एका तरुणाने साधुचे केस आणि दाडी कापल्याचा व्हिडीओ सांप्रदायिक रंग देऊन शेअर केला जात आहे. मात्र माध्यमांनी दिलेल्या वृत्तासोबतच पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधुची दाडी आणि केस कापून साधुला मारहाण करणारा तरुण हा हिंदू समुदायातीलच आहे. तर सध्या तो तरुण पोलिस कोठडीत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ भ्रामक असल्याचे स्पष्ट होत आहे.

Alt News Link: https://www.altnews.in/hindi/false-claim-that-a-monk-beaten-up-by-by-muslim-in-khandwa/

Tags:    

Similar News