Fact Check | ‘आप’च्या अमानतुल्लाह खान यांचं ‘ते’ ट्विट खरं आहे का?

Update: 2020-02-14 13:57 GMT

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून त्यासंदर्भातली वेगवेगळ्या प्रकारची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यासंदर्भातलं असंच एक ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. या पोस्टमध्ये वादग्रस्त मजकूर आहे.

काय आहे व्हायरल पोस्ट –

दिल्लीच्या ओखला मतदारसंघाचे आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या ट्विटरचा हा फोटो आहे. यामध्ये लिहीलं आहे की, “13 राउंड पूरे होने के बाद 72000 वोट से आगे चल रहा हूँ। आज शाहीन बाग़ जीता, आज हमारा इस्लाम जीता है, इंसा अल्लाह, जल्दी ही पूरे इंडिया में इस्लाम की जीत होगी, मेरे सभी भाई बहनों का सुक्रिया, सबने मिल कर अपनी ताकत दिखाई एकता बनाएं रखना, हम इतिहास ज़रूर दोहराएंगे।”

Full View

व्हॉट्सअपवर व्हायरल असलेली पोस्ट

तथ्य पडताळणी –

वेगवेळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हे ट्विट समोर आल्यानंतर ‘मॅक्स महाराष्ट्र’ने याची पडताळणी केली.

११ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचे निकाल लागले. कल समोर येत असताना अमानतुल्लाह खान आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या मतदरसंघातील मतमोजणीबाबत माहिती देत होते. त्यापैकी त्यांच्या एका ट्विटशी एडीट करून ही पोस्ट तयार करण्यात आली आहे.

अमानतुल्ला खान यांची मूळ पोस्ट

ठळक मुद्दा

ट्विटरवर शब्दांचे फॉन्ट, दोन शब्दांमधले अंतर यामध्ये सुसुत्रता असते. अमानतुल्ला खान यांची मूळ पोस्ट आणि व्हायरल होत असलेल्या पोस्टवरील वादग्रस्त मजकूर यांच्यातील फॉन्ट, फॉन्टसाईझ, स्पेसिंग यांच्यामध्ये फरक आहे. शिवाय त्यात व्याकरणाच्या चुकाही आहेत.

CAA आणि NRC च्या विरोधात सुरू झालेल्या शाहीनबाग आंदोलनाचे देशभर पडसाद उमटले. दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये शाहीनबागचा मुद्दा प्रचंड गाजला होता. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा विषय चघळवण्यात आला आणि संपूर्ण निवडणुकीचा प्रचार या मुद्द्याभोवतीच फिरत राहीला.

हे शाहीन बाग दिल्लीच्या ओखला विधानसभा मतदारसंघात येतं आणि अमानतुल्ला खान या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांचा विजय झाल्यानंतर ही पोस्ट व्हायरल करण्यात आली.

निष्कर्ष –

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या ट्विटच्या नावाने व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णतः खोटा आहे. खान यांच्या मूळ पोस्टला एडीट करून तो तयार करण्यात आला आहे.

ज्या फेसबुक-ट्विटर अकाऊंट्स, फेसबुक आणि व्हॉट्सअपग्रृपवर ही पोस्ट व्हायरल होत आहे हे सर्व ग्रृप्स विशिष्ठ विचारधारेशी संबंधित आहेत आणि केवळ गैरसमज निर्माण करण्यासाठी हे व्हायरल करण्यात येतंय.

Similar News