आरे कॉलनी, वाद आणि नेहरू

Update: 2019-10-07 14:05 GMT

देशात कोणतीही राजकीय घडामोड घडत असेल तर त्या घटनेशी पंडीत जवाहरलाल नेहरूंचं नाव जोडण्याचा ट्रेन्ड सुरू झाला आहे. त्यात सध्या गाजत असलेल्या आरे कॉलनीचं प्रकरण तरी कसं अपवाद राहू शकतं.

काल रात्रीपासून पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. ४ मार्च १९५१ चा हा फोटो आहे. १९४९ साली आरे कॉलनीची स्थापना झाली. त्यानंतर १९५१ मध्ये इथे डेअरी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्याचं उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं. जी आरे कॉलनी आज जंगल आहे असा दावा करण्यात येतोय, त्या आरे कॉलनीत उद्घाटनावेळी पंडीत नेहरूंनी झाड लावलं होतं. तेव्हाचा हा फोटो आहे.

आरे दूध प्रकल्पाची पहाणी करताना जवाहरलाल नेहरू

राज्य सरकारने मेट्रो-३ च्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे कॉलनीतील जागा निवडली. त्यानंतर आरे कॉलनी वसाहत आहे की जंगल हा वाद उभा राहीला. ४ ऑक्टोंबरला मुंबई उच्च न्यायालयाने आरे कॉलनीत कारशेड करण्यासंदर्भात निकाल दिल्यानंतर लगेचच रात्रीतून वृक्षतोड सुरु करण्यात आली. आज सर्वोच्च न्यायालयातून या वृक्षतोडीवर स्थगिती येईपर्यंत तब्बल ८० टक्के झाडं तोडण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

आता नेहरूंचा हा फोटो समोर आल्यानंतर त्याला राजकीय संदर्भ नसता आला तरच नवल होतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार मेट्रो बनवण्यासाठी झांडांची कत्तल करत आहे. त्यांना भाजप हायकमांड अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांची साथ आहे. आणि आरे कॉलनीतील ही झाडं लावण्याची सुरूवात नेहरूंनी केली होती हे सांगण्याचा प्रयत्न सध्या या फोटोच्या माध्यमातून होतोय. राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहतायत. त्यात आरेचा मुद्दा तापला आहे. त्यामुळं त्याचा राजकीय फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्यानंतर त्याला देशाचे पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा संदर्भ देण्यात येतो. त्यावरून राजकारणही केलं जातं. मग त्यामध्ये काश्मिरचा मुद्दा असेल, भारत पाकिस्तान फाळणी असेल यासाठी नेहरूच कसे जबाबदार आहेत असा प्रचार केला जातो. याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल यांना नेहरूंनी पंतप्रधान बनू दिलं नाही असं म्हणत ते व्हिलन कसे आहेत हे रंगवण्यात येतं. निवडणुकांमध्ये प्रचारांच्या मुद्द्यात नेहरूंचं नाव घेतलं जातं.

याआधीच्या उदाहरणांमध्ये ते नकारात्मक रूपात मांडण्यात आले होते. आरे कॉलनीच्या विषयात त्यांची सकारात्मक बाजू सांगण्याचा प्रयत्न होतोय. नेहरू यांच्यासंदर्भात अनेक मतमतांतरे आहेत. त्या विषयात आपल्याला जायचं नाही. पण असे महत्वाचे विषय जेव्हा चर्चेत असतात तेव्हा नेहरू समोर येतात. याचं कारण शोधलं पाहिजे.

Similar News