Wagner Chief Plane Crashed : पुतीन यांच्या नाकात दम आणणाऱ्या प्रिगोझिनचा विमान अपघात, पण कोण होता येवगेन प्रिगोझिन?

रशियाच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या व्लादिमीर पुतीन यांच्या नाकात दम आणणाऱ्या येवगेन प्रिगोझिनचा विमान अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. पण पुतीन यांच्या नाकात दम आणणारा येवगेन प्रिगोझिन कोण होता? रशियात पुतीन विरोधकांचं काय होतं? याविषयी जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट....

Update: 2023-08-24 03:58 GMT

गेल्या काही महिन्यांपासून पुतीन यांच्याविरोधात दंड थोपटणारा वॅगनर गृप चर्चेत आला होता. त्याचे प्रमुख प्रिगोझिन यांचा विमान अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे हा अपघात की घातपात? असा संशय निर्माण झाला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा वॅगनर गृप आणि रशियन सैन्य एकत्रित युद्ध लढत होते. त्यावेळी वॅगनर गृपचे प्रमुख आणि व्लादिमीर पुतीन एकमेकांचे खास होते. मात्र त्यानंतर प्रिगोझिन यांनी थेट पुतीन यांना आव्हान देत रशियन सैन्याच्या विरोधात बंड केले. त्यामुळे पुतीन यांचे धाबे दणाणले होते. त्यावेळी पुतीन यांनी प्रिगोझिन यांनी गद्दारी आणि पाठीत खंजिर खुपसल्याचे म्हटले होते. मात्र त्यावेळी प्रिगोझिनने आपण युक्रेनविरोधातील युद्धात कमांड सांभाळणाऱ्या कमांडरांच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे मी गद्दार नाही तर देशभक्त आहे.

पुतीन यांच्याविरोधात वॅगनर गृपने दंड थोपटल्याने पुतीन यांनी एक पाऊल मागे घेतले होते. त्यानंतर पुतीन यांनी प्रिगोझिन यांच्यासोबत समझोता केला. मात्र त्यानंतर काही दिवसातच प्रिगोझिन यांचे विमान क्रॅश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे पुतीन यांच्या विरोधकाच्या मृत्यूमुळे हा अपघात की घातपात? असा संशय निर्माण झाला आहे.

कोण होता प्रिगोझिन?

येवगेन प्रिगोझिन हे पुतीन यांच्या घरातील आचारी होता. तो पुतीन यांच्यासाठी जेवण बनवायचा. त्याचा जन्म 1961 मध्ये लेनिनग्राड शहरात झाला होता. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी मारहाण, फसवणूक, चोरी करायला सुरूवात केली. त्यानंतर त्याला 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र ही शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्याची 9 वर्षात सुटका करण्यात आली. प्रिगोझिन वॅगनर या खासगी सैन्य कंपनीचा प्रमुख होता.

रशिया युक्रेन युद्धात प्रिगोझिनची भूमिका काय?

येवगेन प्रिगोझिन हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा निकटवर्तीय मानला जात होता. तर त्याचा खासगी सैन्यांचा वॅगनर गृप रशियन सैन्यासोबत युक्रेनविरोधात युद्धात उतरला होता.

युक्रेनविरोधातील युद्ध लवकर जिंकवण्यासाठी वॅगनर गृपला युद्धात उतरवण्यात आलं होतं. या सैन्यात 50 हजार पेक्षा जास्त कैद्यांना सहभागी करून घेतलं होतं. यामध्ये 10 हजार कैदी मारले गेले.

न्यूज रिपोर्टमधील माहितीनुसार युक्रेनमध्ये युद्ध लढण्यासाठी रशिया वॅगनर गृपवर 10 हजार डॉलर दर महिन्याला खर्च करत होते. मात्र अचानक वॅगनर गृपचे प्रमुख प्रिगोझिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाच आव्हान देत बंडखोरी केली. त्यामुळे रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतीन यांनी समझोता केला. त्यानंतर आता Embraer Legacy 600, with the tail number RA-02795 या विमानाचा अपघात झाला. या विमानातील प्रवाशांमध्ये वॅगनर गृपचे प्रमुख येवगेन प्रिगोझिन यांच्या नावाचाही समावेश आहे.

रशियाचे फेडरल ट्रान्सपोर्च एजेन्सीचे प्रमुख रोसावित्सिया यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.

पुतीन विरोधकांचे रहस्यमय मृत्यू

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची कारकीर्द कायम वादग्रस्त राहिली आहे. आपल्या विरोधातील विरोधकांना संपविण्यासाठी ते ओळखले जातात. 2021 मध्येही पुतीन यांच्याविरोधात सत्याग्रह करणाऱ्या नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाला होता.

याआधीही पुतीन यांना अध्यक्षपदापर्यंत पोहचवण्यासाठी कारणीभूत ठरलेले माजी प्राध्यापक बेरेझोव्हस्की यांचा वाढता प्रभाव दूर करण्यासाठी त्यांच्यावर पुतीन यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र त्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला आणि तेथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

त्यानंतर एका बनावट बाँबस्फोटात आपला मुखवटा उघडा पडेल यामुळे पुतीन यांनी एक वकील मिखाईल ट्रेपाश्किन यांचाही काटा काढला. त्याबरोबरच पुतीन यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणं शोधून काढणारे पत्रकार आर्टिम बोरोविक यांनाही अपघातात संपवले.

पुतीन यांच्या हुकूमशाहीविरोधात भूमिका घेतलेल्या महिला पत्रकार एना पोलित्कोव्हस्काया यांचा त्यांच्या घरीच गोळ्या झाडून खून करण्यात आला.

एके काळी रशियाचे जगज्जेते माजी बुद्धीबळपट्टू गॅरी कारास्पोह हे विरोधात गेल्याने त्यांचा प्रचंड छळ करून त्यांना देशत्याग करण्यास भाग पाडले.

त्यानंतर आता पुतीन यांच्याविरोधात बंडखोरी करणारे वॅगनर या खासगी गृपचे प्रमुख येवगेन प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने हा अपघात की घात पात असा संशय व्यक्त केला जात आहे.

अनेक वर्षे हाती सत्ता असेल तर ही निरंकूश सत्ता टिकावी म्हणून प्रयत्न केला जातो. त्यातूनच जन्म होतो तो हुकूमशाहीचा. रशियात पुतीन यांची निरंकूश सत्ता आहे. ती टिकविण्यासाठी पुतीन आपल्या विरोधकांना संपवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे झारच्या सत्तेनंतर दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या पुतीन नावाच्या दुसऱ्या झारची सत्ताही उलथून टाकण्यात रशियातील साम्यवादी आणि लोकशाही वाद्यांना यश येईल.


Tags:    

Similar News