मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उतरणार

Update: 2022-07-13 13:55 GMT

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार अशी चर्चा असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्धार करण्यात आला.

पक्ष संघटना वाढवून ती बळकट करायची आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार सक्रीय होणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. "मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे बोरिवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण शहरात स्वतंत्र फादर बॉडी तयार केली आहे. आपण अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याद्वारे पक्षाची भूमिका प्रकर्षाने मांडण्यास मदत होईल' अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.

मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, अशा सूचना छगन भुजबळ यांनी केल्या. तसेच शरद पवार यांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई शहरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Tags:    

Similar News