रमण्णा नाही तर न्याय कोण देणार? अरविंद सावंत यांचा सवाल

शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष महत्वाच्या टप्प्यावर आला आहे. मात्र सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत रमण्णा यांच्याकडूनच न्यायाची अपेक्षा केली आहे.

Update: 2022-08-08 05:29 GMT

राज्यातील सत्तेच्या पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यातच पाच सदस्यीय घटनापीठासंदर्भात 12 ऑगस्ट रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. तर सुनावणीवर तारीख पे तारीख सुरू आहे. तर एन व्ही रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ट्वीट करून न्यायाची खरी अपेक्षा रमण्णा यांच्याकडूनच असल्याचे म्हटले आहे.

अरविंद सावंत यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, देश सध्या घटनात्मक संकटाचा सामना करत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे निवृत्त होत आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमण्णा नाही तर आम्हाला न्याय कोण देणार? असा सवाल अरविंद सावंत यांनी ट्वीटमध्ये उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसह, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या निर्णयावरचा आक्षेप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार बेकायदेशीर असल्याचा करण्यात आलेला आरोप, विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणी यासह सत्तासंघर्षातील मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र यावर घटनापीठ स्थापन करण्याबाबत 12 ऑगस्ट रोजी निर्णयाची शक्यता आहे. त्यापुर्वीच अरविंद सावंत यांनी सरन्यायाधीश रमण्णा यांना भावनिक साद घातली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निवृत्तीनंतर एन व्ही रमण्णा यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र सरन्यायाधीश रमण्णा यांनी अनेक महत्वाचे निकाल दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेसह देशातील अनेक लोकांकडून एन व्ही रमण्णा यांच्या कार्यपध्दतीबद्दल विश्वास आहे. त्यामुळे सरन्यायाधीश रमण्णा निवत्त झाल्यानंतर आम्हाला न्याय कोण देणार असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे.

Tags:    

Similar News