सत्ता संघर्षात भाजप सक्रिय, राज्यपालांकडे मोठी मागणी

Update: 2022-06-28 18:02 GMT

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आता भाजपने उघडपणे उडी घेतलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही जेष्ठ नेत्यांनी रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलेले आहे. भाजपतर्फे गेल्या आठ दिवसात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती, पण आता देवेंद्र फडणवीस हे ऍक्टिव्ह झालेले आहेत. मंगळवारी फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर काही नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबईत परतल्यावर त्यांनी भाजपच्या काही नेत्यांसह राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यात सध्या जो काही पेचप्रसंग निर्माण झालेला आहे तो पाहता सरकारने बहुमत सिद्ध करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे.

यासंदर्भात भाजपने राज्यपालांना एक पत्र दिले आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहायचं नाही अशी भूमिका ते मांडत असल्याचे माध्यमांमधून दिसले आहे. त्यामुळे सरकारने बहुमत सिद्ध करावे अशा स्वरूपाचे पत्र भाजपतर्फे राज्यपालांना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान राज्यपालांनी विशेष अधिवेशनाचे आदेश काढल्याचे एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहे. पण हे पत्र खोटं असल्याचं सिद्ध झालेले आहे. राज्यपालांनी आतापर्यंत विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

Similar News