Udhav Thackeray : समोर येऊन बोला आपण मार्ग काढू !

Update: 2022-06-28 10:05 GMT

एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांना अपात्रतेच्या कारवाईपासून १२ जुलैपर्यंत संरक्षण मिळाले आहे. दुसरीकडे शिवसेनेने (Shivsena )२० आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. पण एकनाथ शिंदे यांनी ५० आमदार स्वमर्जीने आल्याचे सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन केले आहे.

"शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

एकीकडे एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन करत मार्ग काढण्य़ाचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे बंडखोर गटातील मंत्री उदय सामंत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "मी शिवसेनेत आहे..वंदनीय बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धवसाहेव यांच्या शिवसेनेला मविआ मधील घटक पक्षांच्या वाईट नजरेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मा. एकनाथजी शिंदे सोबत..ह्या परिस्थितीत तोडण्याची भाषा करण्या ऐवजी जोडण्याची भाषा महत्वाची आहे..जय महाराष्ट्र"

एकूणच दोन्ही बाजूकडून समंजसपणाची भूमिका घेण्याचे आवाहन केले जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर शिंदे गट काय भूमिका घेतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Similar News