राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

Update: 2021-09-01 03:46 GMT

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षातील मंत्र्यांची बैठक काल सह्याद्री अतिथिगृहावर पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना-काँग्रेससोबत आघाडी करण्यासंबंधी चर्चा झाल्याचे वृत्त आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आदी मंत्र्यांची उपस्थिती होती. सोबतच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात या बैठकीत घेण्यात आला आहे.

मागच्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून सर्वच प्रमुख पक्षाचे नेते स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक महत्वपूर्ण मानली जात होती.

राज्यात पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निडणुकीत सर्वच ठिकाणी शिवसेना, काँग्रेसबरोबर आघाडी होईल असे नाही, मात्र काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी काँग्रेस - शिवसेनेसोबतच आघाडी करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आल्याचं पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यात मुंबईसह २३ महानगरपालिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी कुणाशी आघाडी करायची आणि कुठे स्वबळावर लढायचं याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक मंत्र्याकडे एका जिह्याची जबाबदारी दिल्याच सांगण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News