एकनाथ शिंदेंच्या बंड राज्यपालांना ठाऊक होतं : कपिल सिब्बल यांचा कोर्टात गंभीर आरोप

Update: 2023-02-22 12:00 GMT

शिवसेना कुणाची? १६ आमदारांच्या अपात्रतेचं काय? या सगळ्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना कपिल सिब्बल यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे बंड करणार हे त्यावेळी राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींना माहित होतं असा गंभीर आरोप कपिल सिब्बल यांनी आहे.

देशाच्या राज्य घटनेने राज्यपालांना काही अधिकार दिले आहेत हे मान्य आहेत. मात्र कुठल्या अधिकारात एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी शपथ दिली? राज्यपालांकडे बहुमताचा दावा घेऊन जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा काही गोष्टींचा राज्यपालांवनी विचार करायला हवा होता. एकनाथ शिंदेंच्या विरोधात अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती हे माहित असूनही एकनाथ शिंदेंना शपथ द्यायची की नाही याचा विचार करायला हवा होता. ज्या आमदारांना नोटिशीचं उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत मुदत होती तर कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेंना १२ जुलैपर्यंत थांबायला का सांगितलं नाही असा सवालही कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंड करणार याची कल्पना राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींना होती असाही गंभीर आरोप सिब्बल यांनी कोर्टात केला. राज्यपाल हे घटनात्मक पद असून त्यांनी या पदाचा दुरूपयोग केला असाही आरोप कोर्टात सिब्बल यांनी केला. तसंच एकनाथ शिंदे यांची प्रत्येक कृती पक्षविरोधी होती असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. १६ आमदार हे कसे अपात्र ठरतात हे सांगण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं उदाहरण दिलं. राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेचं पालन केलं नाही. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं काहीही ऐकायला नको होतं असंही सिब्बल यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे हे आत्ता मुख्यमंत्री पदावर असले तरीही ज्यावेळी त्यांनी बंड केलं त्यावेळी त्यांची ती कृती चुकीची होती. त्यांना रोखणं राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांचं कर्तव्य होतं. घटनात्मक पद असूनही राज्यपालांनी सत्तानाट्यामध्ये राजकारण केलं असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

कपिल सिब्बल बोलत नसताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की एखादा माणूस पक्षात आनंदी नसेल तर त्याने काय केलं पाहिजे असं त्यांनी विचारलं आहे. मात्र एकनाथ शिंदे हे चुकीचं वागले. जर एखादी व्यक्ती पक्षात आनंदी नसेल तर त्या व्यक्तीने आपली भूमिका पक्षांतर्गत मांडली पाहिजे असंही उत्तर सिब्बल यांनी दिलं आहे.

जर एकनाथ शिंदे पक्षात असल्याचा दावा करत होते तर आपली नाराजी पक्षांतर्गत का मांडली नाही? असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी पक्षाची घटना पाळली नाही असंही सिब्बल यांनी स्पष्ट केलं.

Tags:    

Similar News