देशात किरकोळ महागाई दर घसरला ! ऑक्टोबरमध्ये फक्त 0.25%
जीएसटी दरकपातीचा परिणाम सर्व क्षेत्रांमध्ये ; अन्नधान्य महागाईतही मोठी घट
देशातील किरकोळ महागाई दर (Retail Inflation) ऑक्टोबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात घसरला असून तो केवळ 0.25 टक्क्यांवर आला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित हा आकडा 2012 पासूनच्या मालिकेतील सर्वात कमी स्तरावर आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने बुधवारी दिली.
मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जीएसटी दरकपातीचा परिणाम सर्वच क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात महागाईत तब्बल 119 बेसिस पॉइंट्सची घट झाली आहे.
अन्नधान्य महागाईत 5% पेक्षा जास्त घट
ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्य महागाई दर (-)5.02 टक्के नोंदवला गेला आहे. ग्रामीण भागात हा दर (-)4.85 टक्के तर शहरी भागात (-)5.18 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत अन्नधान्य महागाईत 269 बेसिस पॉइंट्सने घट झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, तेल व चरबी, भाज्या, फळे, अंडी, धान्य आणि वाहतूक सेवांच्या किमती कमी झाल्याने ही घट झाली आहे. याशिवाय, जीएसटी कपातीचा पूर्ण महिन्याचा परिणाम आणि अनुकूल बेस इफेक्टमुळे महागाई नियंत्रणात राहिली आहे.
ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांत घट स्पष्ट
ग्रामीण भागातील एकूण महागाई सप्टेंबरमधील (-)1.07 टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये (-)0.25 टक्क्यांपर्यंत आली आहे.
शहरी भागातही सप्टेंबरमधील 1.83 टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये 0.88 टक्क्यांवर महागाई आली आहे.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात स्थिरता
ऑक्टोबर महिन्यात शिक्षण क्षेत्रातील वार्षिक महागाई दर 3.49 टक्के, तर आरोग्य क्षेत्रातील महागाई दर 3.86 टक्के नोंदवला गेला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रातील महागाई थोडीशी घटली आहे.