जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतींनी पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली आहे. मंगळवारी सोनं $४०३६ प्रति औंस या नव्या उच्चांकावर पोहोचले, . या वाढीमागे अमेरिकेतील सरकार शटडाऊन, तसेच फ्रान्समधील राजकीय अस्थिरता हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
अमेरिकन शटडाऊनचा सोन्याच्या भावावर परिणाम
अमेरिकेत काँग्रेसकडून निधी विधेयक मंजूर न झाल्यामुळे सरकारचं कामकाज बंद झालं आहे. या शटडाऊनमुळे जवळपास ७ लाख ५० हजार सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाशिवाय रजेवर पाठवण्यात आलं आहे.या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना अर्थव्यवस्थेची अचूक माहिती मिळत नसल्याने त्यांनी सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून वळणं सुरू केलं आहे.
आर्थिक अनिश्चिततेत सोनं ठरलं ‘सेफ हेवन’
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे सोन्याच्या भावाला आणखी बळ मिळालं.
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे जागतिक गुंतवणूकदारांनी डॉलरऐवजी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे.
भारतात सोन्याचा दर
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्यामुळे भारतातही सोन्याचे दर उंचावले आहेत. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी जीएसटी वगळता सुमारे १ लाख २२ हजार रुपये द्यावे लागत आहेत.
सध्या बाजारात अनिश्चिततेचं वातावरण कायम असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
२०२६ च्या अखेरीस सोनं ४,९०० डॉलर्स प्रति औंस पर्यंत पोहचू शकतं असा अंदाज गोल्डमन सॅक्सने वर्तवलाय.