प्लाझ्मा थेरपीच्या नावाने लोकांची फसवणूक, कारवाईचा इशारा
X
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीच्या उपचारावरून जनतेची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार उघडकीस आले आह, त्यामुळे लोकांनी सावध राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
कोरोनाच्या आजारातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातील रक्तद्रव (प्लाझ्मा) काढून रुग्णाला दिला जातो. यामुळे कोरोना रुग्णांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने या उपचार पद्धतीचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी काही रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा डोनेशन मोहिम सुरू केली आहे. या सुविधेचा काहीजण गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. लोकांच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत बनावट प्रमाणपत्रदेखील तयार केली जात आहे.
सायबर गुन्हेगार यासाठी समाजमाध्यमांवर विविध पातळीवर काम करीत आहे. त्यामुळे संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपीबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. प्लाझ्मा डोनर (दाता) ऑनलाईन शोधतानाही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
हे ही वाचा..
#कोरोनाशी_लढा – होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी औषधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Covid19: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर
डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माच्या विक्री संदर्भात माहिती दाखवून फसवणूक होऊ शकते. या संदर्भात कोणालाही तक्रार करायाची असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर नोंदवावी, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.