Home > Top News > आधुनिक मंदिरं उभारणारे नेहरु

आधुनिक मंदिरं उभारणारे नेहरु

आधुनिक मंदिरं उभारणारे नेहरु
X

१९५१ साली सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमास तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना आमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पंडीत नेहरु यांनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याविषयी आपण पुनर्विचार करावा, अशी विनंती केली.

आपण राष्ट्रपती असून मला जे योग्य वाटेल ते मी करेन, असं सांगत प्रसादांनी नेहरुंना उत्तर दिलं. यावर नेहरुंनी जे उत्तर दिलं त्यात ते म्हणतात ‘आपण एका संवैधानिक पदावर आहात. एखाद्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यातून अनेक प्रकारचे अर्थ निघतात. भारतीय धर्मनिरपेक्षतेस बाधा पोहोचेल, अशी कृती होऊ नये. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा विचार करणंही संविधानानुसार जरुरीचं आहे’. असं नेहरु म्हणतात.

हे ही वाचा...

राम मंदीर भूमीपुजन: नियतीने उगवलेला सूड

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

किती पालकांना असं वाटतं की, आपला मुलगा वैज्ञानिक व्हावा?

याला पुन्हा उत्तर देताना प्रसादांनी लिहिलं आहे की – मला उद्या मशीद किंवा चर्चच्या कार्यक्रमास बोलावलं तरी मी कार्यक्रमास जाईन. नेहरुंचा सल्ला धुडकावून लावत राजेंद्र प्रसाद या कार्यक्रमास गेले. पुढे कधी मशीद किंवा चर्चच्या कार्यक्रमास गेल्याविषयी मला तरी कल्पना नाही.

के एम मुन्शी यांनी या संदर्भात मोहीमच उघडली होती. १९३७ साली ‘जय सोमनाथ’ नावाचं पुस्तकच त्यांनी लिहिलं होतं. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार ‘राष्ट्रीय गरज’ असल्याचा दाखला देत त्यांनी हा प्रकल्प पुढे रेटला. सोमनाथ मंदिराच्या ट्रस्टच्या समितीवर ते होते. १९५० ते १९५२ या काळात ते अन्न व कृषी मंत्री होते. पुढे आपले अजेंडे रेटता येईनासे झाले म्हणून कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र पार्टीचा प्रयोग केला. भारतीय विद्या भवन निर्माण केलं. नंतर अगदी विश्व हिंदू परिषद स्थापण्यातही त्यांचा रोल होता.

नेहरुंचा मंदिरांना विरोध नव्हता. मात्र, धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेने विशिष्ट धर्माच्या बाजूने असता कामा नये, अशी त्यांची ठाम धारणा होती. म्हणूनच या सोमनाथ जीर्णोद्धार कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेहरुंनी स्वच्छ लिहिलं की ‘सदर कार्यक्रम शासनाचा नव्हता. हे लक्षात घ्या आणि अशा कार्यक्रमांमध्ये शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण सामील होणं गैर आहे, याची जाणीव सर्वांना हवी.’

विज्ञाननिष्ठेची कास धरत आधुनिक मंदिरं उभारणारा नेहरु हा माणूस वेगळा होता. तो त्यांच्या अशा दृढ कमिटमेंटमुळं. एम्स असो की IIT, IIM असो की आण्विक ऊर्जा आयोग...हे सारं नेहरुंच्या काळात निर्माण झालं. देशाचा पाया भक्कम व्हावा. म्हणून शक्य तेवढे प्रयत्न नेहरुंनी केले.

देशाची घडी बसवणं ही साधी गोष्ट नव्हती. या माणसाने देशाची घडी बसवलीच आणि त्यासोबत देशाला दिशाही दाखवली एके काळी आपल्याला नेहरुंसारखे पंतप्रधान लाभले होते. ज्यांची भारतीय संविधानावर अविचल निष्ठा होती !

श्रीरंजन आवटे

Updated : 5 Aug 2020 1:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top