मंदी यात्रा

Update: 2019-09-04 06:16 GMT

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देश्यून केलेल्या भाषणात पाच ट्रिलियन इकॉनॉमीचा संदेश दिला. पंतप्रधानांकडून अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांबाबत कधीच काही भाष्य आलेले नाही. मंदीचा प्रश्न विचारल्यावर पंतप्रधानांचे शिलेदार तुम्हाला महागाई वाढलेली दिसते काय? असा प्रतिप्रश्न करतात. यामुळे देशात मंदी किंवा आर्थिक विकासाला काही समस्या आहेत, हे सत्ताधारी पक्ष मान्य करत असल्याचं दिसत नाहीय. असं असलं तरी देशाच्या अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातील सर्व बहीखाता सुधारणांना मागे घेत आहेत, आणि नवीन आर्थिक सुधारणांच्या घोषणा करतायत. त्या करत असताना त्या अर्थव्यवस्था बिघडलीय असं कुठे ही मान्य करत नाहीत, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हे सर्व केलं जातंय, असं सांगीतलं जातंय. आजार आहे, हे मान्य केलं तर उपाय आहेत, नाही केलं तर नीम हकीम खतरा-ए-जान आहेच...

देशाची अर्थव्यवस्था मंदीत आहे, हे सरकार मान्य करत नाहीय, सरकारचं म्हणणं आहे भारताची अर्थव्यवस्था जगातील सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था आहे असं सरकारने अधिकृत सांगीतलंय. हे पूर्वीच्या हिंदी चित्रपटातल्या गाण्यांमधल्या गाडी सारखं आहे, गाडी जागेवरच असायची मागचं बॅकड्रॉपच पळायचं, गाडी वेगात असल्याचा भास निर्माण करून दिला जायचा. पाहणाऱ्याला ही बरं आणि शूट साठीही बरं. एका स्टुडीयोत हे काम पूर्ण व्हायचं. असो, तर विषय होता की, पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून सांगीतलंय. देशाची अर्थव्यवस्था आता ज्या परिस्थितीतून जात आहे त्याला काँग्रेसच्या काळातला भ्रष्टाचार जबाबदार आहे असं सांगण्यात आलंय.

त्यासाठी आता काँग्रेसच्या नेत्यांच्या धरपकडा सुरू आहेत. देशासमोर एक विकासाचं मोठं चित्र निर्माण केलं गेलंय. सर्व घोटाळेबाज आत गेले की आपोआप सर्व ठीक होईल अशा आशेवर अनेक जण आहेत. आपणही राहू या. मला वाटतं ज्या गृहीतकांवर सरकारने आर्थिक विकासाची गती किंवा दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला फार चिकित्सेची गरज नाहीय. सध्या सरकार भावनिक आधारावर अर्थव्यवस्थेची वाढ करण्याच्या प्रयत्नात आहे. सेन्टीमेंट वर अर्थव्यवस्था-मार्केट चालतं असं सरकारचं मानणं आहे.

पंतप्रधानांनी देशाला सांगितलं की, देशात पर्यटन करा. यामुळे अर्थव्यवस्थेला गती येईल, लोकांना आपला देश ही माहीत होईल, संस्कृती कळेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून मार्केट मध्ये पैसा आणला पाहिजे अशी धारणा यामागे आहे. पाच ट्रिलियन चं लक्ष्य अशक्य आहे, असं अनेकांना वाटतं आणि ते गाठण्यासाठी खूप पापड बेलावे लागणार आहेत, पण मोदी सर्व अशक्य कामंच शक्य करून दाखवतात, यावर आता देशाचा विश्वास बसला आहे.

देशाच्या या विश्वासावर प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही, म्हणून आम्ही पर्यटनाला निघायचं ठरवलं आहे. मॅक्समहाराष्ट्र ने यासाठीच मंदीयात्रा सुरू केलीय. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसं, छोटे उद्योग, गृहउद्योग अशा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतापर्यंत ज्या ज्या क्षेत्रातले रिपोर्ट आले ते पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्द्यांशी किंवा अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतल्या चित्राशी सुसंगत नाहीय.

सरकार ज्या आकडेवारीवर विश्वास ठेवायला सांगत आहे, त्यावर विश्वास ठेवला तर बोट रसातळाला जाईल असा काँग्रेसचा दावा आहे, काँग्रेस स्वतः रसातळाला गेलेला पक्ष आहे, काँग्रेस काय सांगतंय याकडे सरकार आणि लोकांना कोणालाच बघायला वेळ नाहीय.

नमो ऍप वरच्या इन्फोग्राफिक्सचा मारा इतका तगडा आहे की, सरकारवर मनमोहन सिंह यांच्या सल्ल्यांचा ही प्रभाव पडताना दिसत नाही. कोणी ऐकत नाही म्हणून सांगायचं बंद करावं का, तर मला वाटतं आपल्याला जे सत्य उमगलंय ते सांगत राहावं हा खरा धर्म आहे. जे चित्र आहे ते मांडलं पाहिजे. या वाटेवर चालत राहायला पाहिजे. या मंदीयात्रेत आपणही सामील व्हा. पोहोचू न पोहोचू पण चालत राहायला पाहिजे. शेवटी हा देश आपला आहे.

Similar News

यंदा कोण...?