आंबेडकरी पत्रकारिता हाच मुख्यप्रवाह !

Update: 2020-04-13 20:00 GMT

माध्यमं हा जनमानसाचा आरसा असतो असं म्हणतात. पण हा आरसा तुम्हाला खरे प्रतिबिंब दाखवलेच असं काही नाही. माध्यमं तुम्हाला समाजाचं तेच रूप दाखवतात जे त्यांना दाखवायचंय. जर माध्यमांकडे बघून आपण आपल्या समाजाचा अंदाज बांधायला गेलो तर भारतीय समाज अत्यंत संपन्न, इतर काही कामं शिल्लक नसल्याने गाईच्या आणि बाईच्या मागे लागलेला, हिंदुत्ववादी विचारसरणीचा किॅवा हिंदूराष्ट्र वगैरे वाटायला लागेल.

माध्यमांकडे बघून समाजाचा अंदाज बांधायला गेलो तर भारतात दररोज मूर्खपणा सिद्ध करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा लागलेल्या असतात की काय असा ही समज होऊ शकतो. त्यामुळे माध्यमांची चर्चा करायची असेल तर त्यांच्याकडे सुवर्णालंकारी कोंदणातून न पाहता वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिलं पाहिजे. भारतीय माध्यमं हा देशाचं खरा चेहरा दाखवू शकत नाहीत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच ओळखलं होतं. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली माध्यमं आणि पत्रकार 'जो तुमको हो पसंद वहीं बात करेंगें' अशा पद्धतीनेच वागणार. अशा वेळी आपलं स्वत:चं माध्यम असायला हवं, जे दलित-शोषित जनतेचा आवाज उचलेल अशी गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेला सुरूवात झाली. एका दृष्टीकोनातून यासाठी काँग्रेसचे आभार मानायला हवेत.

माध्यमांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले चिंतन हे आजही किती मोलाचं आहे. माध्यमांवर एका विशिष्ट पक्ष, भांडवलदार आणि विचारांची मालकी आल्यावर कस करायला पाहिजे, असा प्रश्न मला पडला नाही. मला त्यासाठी विचार करण्यावर वेळ घालवावा लागला नाही. आपला विचार मांडायचा तर माध्यमं आपली असली पाहिजेत. मुख्यप्रवाहातील माध्यमांकडून फार अपेक्षा ठेवता येणार नाही, एखादा हिरो पकडायचा आणि त्याची पूजा करायची हा प्रकार तेव्हाही सुरू होता आणि आजही सुरू आहे. फरक एवढाच आहे की तेव्हा मुख्य प्रवाह हे करत होता, आता मुख्य आणि पर्यायी माध्यमं ही हेच करताना दिसतायात.

मुख्य प्रवाहातील माध्यमं पक्षपातीपणे वागल्यामुळे समाजातील महत्त्वाचे प्रश्न, लढे, हितसंबंधांना बाधा आणणारे विषय यांकडे पूर्णत: डोळेझाक होते. कधी कधी माध्यमांचा अजेंडा इतका विषारी असतो की जर तुम्ही तयारीचे नसाल तर तुम्ही संपून जाऊ शकता. डॉ. आंबेडकरांना, त्यांच्या मागण्यांना अनेकदा मुख्य प्रवाहातील माध्यमांनी टीकेचं लक्ष्य बनवलं. दलितांसाठी वेगळा मतदारसंघ मागणे म्हणजे हिंदू विरोधी, देश विरोधी आहे असं चित्र माध्यमांनी रंगवलं. आज जसं आपण वेळोवेळी वेगवेगळ्या इश्यूवर राष्ट्रीयत्वाची परीक्षा द्यावी अशी राजकीय व्यवस्थेची आणि माध्यमांची अपेक्षा असते तशी त्यावेळी काँग्रेसप्रणित माध्यमांच्या राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येवर खरं उतरावं लागे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं समाजकारण, राजकारण या व्याख्येत बसत नव्हतं. महात्मा गांधी आणि डॉ आंबेडकर या दोन राष्ट्रीय पुरुषांकडे बघण्याचा माध्यमांचा दृष्टीकोन वेगवेगळ्या होता. दलित उद्धारासाठी काम करणाऱ्या आंबेडकरांना प्रसंगी भीमासुर म्हणणारी माध्यमं गांधीजींच्या 'हरिजन' संकल्पनेला डोक्यावर उचलून नाचत होती. डॉ. आंबेडकरांच्या रक्तहीन आंदोलनांना माध्यमांनी कधीच सत्याग्रह मानलं नाही. काळाराम मंदिर किंवा चवदार तळ्याच्या आंदोलनातून जो सामाजिक उत्थानाचा, न्यायाचा जो लढा उभारला गेला त्या लढ्यांच्या पायावर आजचा भारत उभा आहे.

मूकनायक ते प्रबुद्ध भारत असा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा प्रवास आहे. मूकनायकाला आवाज मिळवून देऊन प्रबुद्ध करण्याची प्रक्रीया डॉ. आंबेडकरांनी पार पाडली. त्यानंतर राज्यघटनेची निर्मिती करत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत देणगी या महामानवाने दिली. तरी सुद्धा भारतीय माध्यमांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन फार बदलला नाही. आजही ६ डिसेंबरला लाखों लोक चैत्यभूमीवर गोळा होत असूनही माध्यमांमध्ये त्याचं प्रतिबिंब पडत नाही. गर्दी गोळा करायला 'नवसाला पावणारा' असं मार्केटींग करावं लागत नाही. ही आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांनी केलेल्या कामांची, विचारांची ताकत आहे. डॉ. आंबेडकर यांनी सदैव मुख्य प्रवाहातील विचारधारेला आव्हान दिलं, मुख्यप्रवाहाच्या मेहरबानीवर अवलंबून न राहता वेगळा प्रवाह निर्माण केला. मुख्य प्रवाहावर दबाव निर्माण केला. आपल्या लढ्याला रक्तरंजित होऊ दिलं नाही. देश तुटू दिला नाही. तरी डॉ आंबेडकर मुख्य प्रवाह नाहीत?

डॉ. आंबेडकरांच्या वाट्याला ही अवहेलना का आली असावी याचा अंदाज आपल्याला योगेंद्र यादव यांनी केलेल्या एका सर्व्हेतून लक्षात येतं. देशातील हिंदी आणि इंग्रजीतील ३१५ प्रभावशाली पत्रकारांमध्ये एकही दलित आढळून आला नाही. त्यातील ७१ टक्के पत्रकार हे उच्चवर्णीय पुरूष होते. माध्यमांवर आजही जातीविशेष चा पगडा आहे. त्यातही पुरूषांचा! डॉ. आंबेडकरांना त्याकाळी माध्यमांनी डोक्यावर का घेतलं नसेल याचा अंदाज आपल्याला यातून बांधता येतो.

डॉ. आंबेडकरांनी दिलेली जाहिरात टिळकांनी का नाकारली असेल, त्याचं उत्तरही आपल्याला आपोआप सापडेल. हे नाकारणं, जातीयवादी भूमिकेतून होते की प्रस्थापित मानसिकतेतून यावर चर्चा होऊ शकते. पण जे काही आहे, या घटनेने ही लढाई सोपी नाही याचा डॉ आंबेडकरांना जाणीव मात्र करून दिली.

माध्यमांवरील वर्चस्व हे पैशाच्या ताकदीवर सुद्धा मिळवता येतं. पैशाची ताकत ज्यांच्याकडे होती किॅवा आहे त्यांना आजही त्यांचा अजेंडा पुढे रेटण्यामध्ये रस आहे. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता करत असताना आंबेडकरांनी पैसे कमवण्याकडे सुद्धा लक्ष दिलं आणि वकिली सुरू ठेवली.

हा इतिहास इतक्यासाठीच उगाळणे आवश्यक आहे की, आजची स्थिती ही काही वेगळी नाही. तेव्हा माध्यमं काँग्रेसच्या प्रभावाखाली होती आज ती भाजपच्या प्रभावाखाली आहेत. तेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेच्या विरोधात भूमिका घेता येत नव्हती आज भाजपच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेने उच्छाद मांडला आहे. अशा वेळी डॉ आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग प्रशस्त वाटतो. आपले प्रश्न मांडण्यासाठी आपली माध्यमं उभी करा. आज समाजमाध्यमाच्या (सोशल मिडीयाच्या) माध्यमातून हे करणं सोप्पं झालंय. मुख्य प्रवाहातील माध्यमांवर विसंबून राहता येणार नाही. समाजमाध्यमं, अल्टरनेट मिडीया मुख्य प्रवाहातील माध्यमांवर प्रभाव आणि दबाव निर्माण करू शकतो.

समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये असे 'आंबेडकरी' पत्रकार निर्माण होणे गरजेचे आहे. आपले प्रश्न, समस्यांसाठी लढणारे, आवाज उठवणारे हे प्रवाह हे 'वैकल्पिक'-अल्टरनेट माध्यमं नसून हाच खरा मुख्य प्रवाह आहे. आंबेडकरांची पत्रकारिता आपल्याला हाच संदेश देते.

  • रवींद्र आंबेकर

Similar News