'योगीताने लावला झोपडीतील पणतीच्या उजेडात यशाचा दिवा'

Update: 2020-07-17 09:23 GMT

घरची आर्थिक परिस्थिती बिकट... राहायला झोपडीत... घरी विजेच्या सुविधेचा अभाव... पणतीच्या उजेडात अभ्यास करत नुकत्याच झालेल्या 12 वीच्या परीक्षेत 71 टक्के गुण मिळवुन योगिताने यश मिळविले. ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील योगिता राजेंद्र कांबळे हिच्या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्षणाचे महत्व पटवून देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे पिणार तो गुरुगुरल्याशिवाय राहत नाही, असा मंत्र दिला होता. या उक्तीला न्याय देण्याचे काम योगिता कांबळे हिने केले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. वडील राजेंद्र कांबळे कलाकार असून वेगवेगळ्या बँजो ग्रुप मध्ये वाजवून घरचा उदरनिर्वाह करतात. आई सविता कांबळे शेतमजुरीचे काम करते. तर मोठा भाऊ योगेश कांबळे खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत आहे.

सर्वांचा पगार जेमतेमच असल्याने कुटुंबाची वणवण होत आहे. पैसे नसल्याने घर बांधता येत नसल्याची खंत वडील राजेंद्र कांबळे व्यक्त करत आहेत. सध्या हे कुटूंब झोपडीत राहून आपला उदरनिर्वाह करत आहेत. घरी विजेच्या सुविधेचा अभाव असल्याने नेहमी अंधार असतो. पावसाच्या दिवसात झोपडीत पाणी गळेल अशी परिस्थिती आहे. मात्र, याचे कोणतेही निमित्त न करता योगिता कांबळे हिने आपले मन अभ्यासात गुंतविले.

पहाटे 4 वाजता उठून पणतीच्या उजेडात ती अभ्यासाला बसत होती. या बरोबरच दिवसाला शेजारी असणाऱ्या चुलत्यांकडे जाऊन ती अभ्यास करत होती. योगीताने कोणतीही खासगी शिकवणी सुरू केली नव्हती. स्वतःच अभ्यास करून यश मिळविण्याचा ध्यास तिने ठेवला होता. परीक्षेचा निकाल लागला आणि ती 71 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समजताच तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात हॉटेल मॅनेजमेंट करण्याचे तिचे स्वप्न आहे. तर आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला कसे शिकवायचे असा प्रश्न घरच्यांसमोर पडला आहे.

योगिताला या संदर्भात विचारलं असता योगिता सांगते ‘मी रोज अभ्यास करत होते. त्यामुळे परीक्षेचा ताण आला नाही. पुढे मला हॉटेल मॅनेजमेंट करायची ईच्छा आहे.’

योगिताचे वडील राजेंद्र कांबळे यांना आपल्या लेकीचं फार कौतुक वाटतं. ते म्हणतात

‘पहाटे उठून ती पणती लावून अभ्यासाला बसत होती. अनेक वेळा ती कधी अभ्यास करायची आम्हालाही समजायचे नाही. पैसे नसल्याने पक्के घर बांधता आले नाही. तिला कोणतीही सुविधा देता आली नाही. तरी देखील तिने मिळविलेल्या यशाचे समाधान आहे.’

आज हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण करण्याचं स्वप्न योगितानं पाहिलं आहे. समाजानं तिच्या शिक्षणासाठी हातभार लावला तर एका झोपडीतील मुलगी तिच्या पायावर नक्कीच उभी राहिल.

Similar News