राजकारणी सत्ताकारणात व्यस्त, जनता समस्यांनी त्रस्त

Update: 2022-06-23 13:17 GMT

राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना राज्य सरकारचा कारभार बेभरोसे चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या पार्श्वभूमीवर सामान्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याचे एक धक्कादायक उदाहरण जालना जिल्ह्यात समोर आले आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून नळाला पाणी का मिळत नाही असा जाब विचारणाऱ्या महिलांना ग्रामपंचायतच्या शिपायाने बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. जालना जिल्ह्यातील पाचनवडगाव या गावात हा प्रकार घडला आहे. या शिपायाने काठीने मारहाण केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या मारहाणीत 3 महिला जखमी झाला झाल्या असून या प्रकरणी जखमी महिलांसह गावातील इतर महिलांनी मारहाण करणाऱ्या ग्रामपंचायत शिपायाच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

या प्रकरणी तालुका जालना पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान मारहाण करणाऱ्या शिपायासह सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी आणि या तिघांनी राजिनामे द्यावे, अशी मागणी महिलांनी केलीय.

दरम्यान या वादावर ग्रामसेवकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.. ग्रामपंचायत शिपायाने महिलांवर हात उचलला असून त्यावर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कारवाई केली जाईल असं आश्वासन ग्रामसेवकांनी दिले आहे. तर महिलांनीच गल्लीतील पाईपलाईन फोडल्याने त्यांच्या गल्लीत पाणी गेलं नाही असं देखील त्यांचे म्हणणे आहे.

Similar News