बंडखोर आमदारांच्या आरोग्य तपासणीसाठी बळाचा वापर ?

Update: 2020-03-16 08:42 GMT

गेले अनेक दिवस कर्नाटक सरकारच्या निगराणीखाली बंगळुरूमध्ये ठाण मांडून बसलेल्या बंडखोर काँग्रेस आमदारांना अखेर अधिवेशनासाठी मध्यप्रदेशात यावं लागलं. मात्र अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित झाल्यावर आता हे आमदार पुन्हा बंगळुरूमध्ये जातील की अन्य राज्यांमध्ये हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र बंगळूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे त्याचा संदर्भ घेऊन आरोग्य तपासणीसाठी मध्यप्रदेश सरकार सर्व बंडखोर आमदारांना बळाने ताब्यात घेऊ शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

पत्रकार डीपी सतिश यांनी आमदारांसोबत रूग्णवाहिका व तीन डाॅक्टरांचं पथक असल्याचं ट्वीट करून आमदारांना कोरोनाची लागण झालीय का, अशी शंका व्यक्त केलीय.

मध्यप्रदेशात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार होतं. राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर सरकार अर्थसंकल्प मांडणार होतं. परंतु राज्यपालांनी कमलनाथ सरकारला पत्र लिहून बहुमत चाचणीला सामोरं जाण्याचा आदेश दिला होता. काँग्रेसमधील 22 आमदारांनी सरकारविरोधात बंड केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी हा आदेश दिला होता. त्यामुळे आज मध्यप्रदेशात राजकारण नेमकं कोणतं वळण घेतं हे स्पष्ट होणार होतं.

परंतु कोरोना आजाराचा संसर्ग देशभर पसरल्याचा आधार घेऊन कमलनाथ यांनी पहिल्या डावात बाजी मारली आहे. आजचं अधिवेशन 26 मार्चपर्यंत स्थगित करण्यात ते सफल झाले आहेत. बंडखोर 22 पैकी 6 आमदारांचा राजीनामा यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित सोळा आमदारांचं मन वळवण्यासाठी कमलनाथ आता कोणती पावलं टाकतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांनी राजकीय हस्तक्षेपासंदर्भात पत्र लिहून खडे बोल सुनावले आहेत.

https://twitter.com/INCMP/status/1239422290569228288?s=19

एका बाजूला काँग्रेसच्या आमदारांनी बंड केलेलं असलं तरी भाजपामधूनही बंडाची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपा आमदार शरद कोल यांच्यावर आपण राजीनामा दिला नसल्याचा खुलासा करण्याची पाळी आली आहे. भारतीय जनता पार्टीनेही आपले आमदार सुरक्षित ठिकाणी हलवले असून सर्वांसाठी पक्षादेश जारी केला आहे.

 

Similar News