धक्कादायक! दिल्लीत लष्करी गणवेशातील ‘ते’ जवान कोण?

Update: 2020-02-25 08:03 GMT

सीएए आणि एनआरसीविरोधात दिल्लीत होत असलेल्या आंदोलनातून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. कालपासून दिल्लीच्या ईशान्य भागात हिंसाचार उफाळला होता. याठिकाणी गोळीबाराच्याही घटना घडल्या आहेत. यात आतापर्यंत एका पोलिसासह इतर ४ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले. मात्र, या प्रकरणामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

यादरम्यान परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आल्याचं वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले होते. यासोबत जवानांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र, भारतीय लष्कराने ट्विट करत, आमचे कोणतेही सैनिक दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता दिल्लीत सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले लष्करी पोशाखातील व्यक्ती कोण आहेत, असा प्रश्न निर्माण होतोय.

जाफराबादमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी या भागामध्ये लष्करी गणवेशातील जवान तैनात करण्यात आल्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला.

रविवारी सकाळी १० वाजता ‘एएनआय’ने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये लष्करी पोशाखातील शेकडो जवान रस्त्यावरुन चालताना दिसत आहेत. “जाफराबाद मेट्रो स्थानक परिसरामध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आंदोलक या मेट्रो स्थानकाजवळ आंदोलन करत आहेत,” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

It is clarified that Indian Army wasn't deployed. https://t.co/D3Doh1QCqK

त्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. “अंतर्गत सुरक्षेसाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आलं नव्हतं हे आम्ही स्पष्ट करु इच्छितो,” असं ट्विट लष्कराकडून करण्यात आलंय.

Similar News