बजेट २०२१ – मुंबईला काय मिळाले?

Update: 2021-03-08 14:17 GMT

आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन राज्याच्या बजेटमध्ये मुंबईमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी आणि काही नवीन प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडूप, वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय झाला असून त्‍याकरीता 19 हजार 500 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प मालाड उपनगरातील मनोरी येथे उभारण्याबाबत प्राथमिक सर्वेक्षण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल डिसेंबर 2021 पूर्वी अपेक्षित आह, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

मिठी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी 450 कोटी रूपये निधी देण्यात येईल. तर दहिसर, पोईसर व ओशिवरा नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी 1 हजार 550 कोटी रूपयांची कामे सुरु करण्यात येत आहेत, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. वांद्रे-वर्सोवा- विरार या सागरी सेतू प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे तकाम सुरू असून अंदाजित किंमत 42 हजार कोटी असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील 14 मेट्रो लाईन्सचे 337 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर असून त्‍याकरीता 1 लाख 40 हजार 814 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रोमार्ग 2 अ , मेट्रोमार्ग 7 या मार्गांवरील कामे 2021 पर्यंत पूर्ण करण्यात येती, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Full View

गोरेगाव - मुलुंड लिंकरोड प्रकल्पाची अंदाजित किंमत 6 हजार 600 कोटी रुपये असून कामाच्या टेंडरची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील रेल्वे रुळावरील 7 उड्डाणपूलांची कामेही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगतिले. वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्याना दरम्यान,त्यांना जोडणारा पादचारी पूल उभारण्यात येणार असून या प्रकल्पाकरीता 98 कोटी 81 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या वर्षभरात मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांवर मुंबई महानगर क्षेत्र विकास महामंडळामार्फत सायकलींकरिता स्वंतत्र मार्गिका तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

ठाणे खाडीला समांतर सुमारे 15 किलोमीटर लांबीचा व 40 मीटर रूंदीचा "ठाणे कोस्टल रोड" उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे 1 हजार 250 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई , ठाणे व नवी मुंबई या शहरांना जलमार्गाने जोडण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येईल. त्यासाठी कोलशेत, काल्हेर, डोंबिवली आणि मीरा भाईंदर या चार ठिकाणी जेट्टी उभारण्यात येतील असेही अजित पवार यांनी जाहीर केले.

Tags:    

Similar News