जीडीपीच्या चर्चा गावातील पारावर कधी होणार? – संजीव चांदोरकर

Update: 2019-08-31 02:55 GMT

दुर्दैवाने देशाची जीडीपी वाढली का कमी झाली? याच्या चर्चा फक्त अर्थतज्ञ, सेमिनार हॉल्स, इंग्रजी मीडिया, स्टॉक मार्केट्स मध्ये होतात. ज्या दिवशी जीडीपीच्या चर्चा गावातील पारावर, देवळांमध्ये, मशिदींमध्ये, चहाच्या टपरीवर, तरुणांच्या अड्ड्यावर, मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये, चाळीतील बायांच्या गप्पांमध्ये सुरु होतील. त्यावेळी कधीही वितळू न शकणारे बर्फ वितळू लागले आहे असे समजावे.

कोण्या डाव्या विचांरांच्या अर्थतज्ञांचे नाही गुरुशरण दास, प्रॉक्टर अँड गॅम्बल यांचे विश्लेषण ऐका !

जीडीपी मंदावल्यामुळे कोट्यवधी कुटुंबाना झळ बसू शकते ! गुरुशरण दास भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठे नाव आहे आणि कडवे “अँटी लेफ्ट” म्हणून ओळखले जातात. भारतीय अर्थव्यवस्था किमान गेली पाच तिमाही सातत्याने मंदावत आहे; तिचा वाढ दर बघा

  • २०१८ च्या पहिल्या तिमाहीत : ८%

  • २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत : ७%

  • २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत : ६.६ %

  • २०१८ च्या चौथ्या तिमाहीत : ५.८%

  • २०१९ च्या पहिल्या तिमाहीत : ५%

म्हणजे गेल्या १५ महिन्यात जीडीपी ३ टक्क्यांनी मंदावली

भारताची वार्षिक जीडीपी १९० लाख कोटी रुपये आहे; त्याचे ३ टक्के म्हणजे अंदाजे ६ लाख कोटी रुपयांचे वस्तुमाल सेवांचे उत्पादन होऊ शकले असते ते झाले नाही.

गुरुशरण दास यांच्या मते जीडीपीच्या जेव्हा १ टक्के घसरण होते त्यावेळी औपचारिक / सेमी औपचारिक क्षेत्रातील अंदाजे १५ लाख रोजगारावर गंडांतर येते.

औपचारिक क्षेत्रातील प्रत्येकी एका रोजगारामुळे अनौपचारिक क्षेत्रातील / सेवा क्षेत्रातील ३ रोजगार तयार होतात. म्हणजे जीडीपीत एक टक्का घसरण झाली की ६० लाख रोजगारांवर परिणाम होतो. मागच्या ५ तिमाहीत ३ टक्के जीडीपी घसरली असेल तर १८० लाख रोजदारांवर परिणाम झाला असला पाहिजे.

एका रोजगारावर चार किंवा पाच माणसे (म्हातारे / लहान मुले ) अवलंबून असतील तर ७ कोटी ते ९ कोटी नागरिकांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असेल.

अहो तुम्ही धर्म, जाती, पाकिस्तान, भाजप, काँग्रेस याबद्दल तावातावाने चर्चा करा आम्ही नाही नाही म्हणत. पण स्वतःच्या हितसंबंधांच्या गोष्टी किमान समजून तरी घ्या !

Similar News