हरियाणातील हिसार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण

Update: 2021-11-07 03:50 GMT

चंदीगड : हरियाणातील हिसार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या निदर्शनाला हिंसक वळण लागले आहे. भाजपचे राज्यसभा खासदार रामचंदर जांगरा यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. बेरोजगार व मद्यपी अशा शब्दात जांगरा यांनी आंदोलकांना हिणविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर रोहतक जिल्ह्यात शेतकरी आंदोलकांनी भाजपच्या काही नेत्यांना एका मंदिरात सुमारे सात तास कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. खासदार रामचंदर जांगरा हे हिसार जिल्ह्यातील नारनौंड या शहरात एका धर्मशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी आधी काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारांमुळे शेतकरी आंदोलकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे कार्यक्रमस्थळी आंदोलक जमले व त्यांनी जांगरा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून आंदोलकांनी खासदारांच्या गाडीवर हल्ला केला व कारच्या काचा फोडल्या. निदर्शकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा भाजप खासदारांनी केला. तर भाजप गुंडांनी आमच्यावर हल्ला केल्याचे शेतकरी आंदोलकांचे म्हणणे आहे. 

या घटनेत शेतकरी नेते रवी आझाद व शेतकरी कुलदीप राणा हे जखमी झाले असून, त्यांना हिसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र कुलदीप राणा नाल्यात पडल्यामुळे जखमी झाले आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News