कोरोनाचे महासंकट: ट्रम्प यांचा परदेशी स्थलांतरीतांबाबत मोठा निर्णय!

Update: 2020-04-22 01:04 GMT

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकांचे रोजगार वाचवण्यासाठी आता परदेशी स्थलांतरीतांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे, म्हणजेच आता ग्रीन कार्ड मिळणार नाहीयेत. “सुरूवातीला ही बंदी २ महिन्यांसाठी असेल पण त्यानंतर आर्थिक परिस्थिती पाहून ही बंदी वाढवण्याबाबत किंवा त्यात सुधारणा करण्याबाबत विचार करता येऊ शकतो”, असंही ट्रम्प यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यासंदर्भातल्या अध्यादेशावर ट्रम्प बुधवारी स्वाक्षरी करतील.

“अमेरिका सध्या एका अदृष्य शत्रूशी लढत आहे आणि इथल्या नागरिकांचे रोजगार वाचवण्यासाठी हा निर्णय आपण घेत आहोत” असे ट्रम्प यांनी आधीच ट्विट करुन जाहीर केले होते. पण ट्रम्प यांच्या विरोधकांनी या निर्णय़ावरुन टीका केली आहे. ट्रम्प यांनी आपला राजकीय अजेंडा या निमित्ताने राबवला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पण लॉकडाऊनमुळे आधीच सर्व देशांनी आपापल्या हवाई सीमा बंद केल्या आहेत. पण ट्रम्प यांनी २ महिन्यांनंतर आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने अमेरिकत ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आता वाट पाहावी लागणार आहे. अमेरिकेत कोरोनाबाधीतांची संख्या ८ लाखांच्यावर पोहोचली आहे तर मृतांची संख्या ४४ हजार झाली आहे.

Similar News