रिपब्लिक टिव्हीच्या 2 पत्रकारांना 5 दिवसांची पोलिस कोठडी

Update: 2020-09-09 15:15 GMT

रायगड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली. उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिन व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हे तीनही पत्रकार रिपब्लिक टिव्हीचे असून मुख्यमंत्र्यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनुज कुमार, जसपाल सिंह, प्रदीप धनवडे अशी या तिघांची नावं आहेत. तिघांनाही अटक करुन कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टानं त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खालापूर तालुक्यातील भिलवले भागात उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास टुरीस्ट कारने आलेल्या तिघा जणांनी बंगल्याची रेकी केली.

फार्महाऊसच्या दिशेने निघालेल्या सुरक्षारक्षकाकडे या तरुणांनी ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली. सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आपल्याला माहित नसल्याचे सांगितले. मात्र ड्युटीवर आलेल्या सुरक्षा रक्षकापाठोपाठ हे तरुण तिथे पोहोचले आणि “माहिती असूनही खोटे का सांगितले?” असे विचारत तक्रारदार सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असा आरोप आहे.

बंगल्याची पाहणी करुन तिघे जण मुंबईकडे निघाले, तेव्हा फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीची पावले उचलत कार नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून या तिघा जणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे.

रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक स्वत: खालापूरला एटीएससोबत तपास कार्यात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे रविवारी समोर आले होते. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दुबईवरुन शनिवारी रात्री 2 वाजता मातोश्रीवर फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र, कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे.

शरद पवार यांनाही भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. तर कंगना रनौतविषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही 9 ते 10 वेळा धमकीचे फोन आले. हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

Similar News