दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ; अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

Update: 2021-12-02 06:03 GMT

मुंबई  :  डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबई आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात काल रात्रीपासूनच अनेक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. सकाळी देखील काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. बंद करून ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट पुन्हा बाहेर निघाल्या. मुंबईसह कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात 3 डिसेंबर पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई ठाण्याला 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर पालघर , नाशिक , धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह शेजारील नवी मुंबई, ठाणे, रायगड ,पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस असून पुढील 48 तासात 70 ते 120 मिलिमीटर पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने निघालेले चक्रीवादळ वायव्येला सरकल्याने अरबी समुद्र, मालदीव , लक्षद्वीपमधील हवामान बदलले आहे. त्याठिकाणी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस होत असल्याचे हवामान हवामान खात्याचे म्हणणे आहे. दरम्यान पालघर, नाशिक, धुळे , नंदूरबार , जळगाव , औरंगाबाद,जालना , बीड या जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे. उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण महाराष्ट्र गोवा येथील किनारपट्टीवर वादळी हवामान होऊन ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. 3 डिसेंबर पर्यंत ही स्थिती आणखी तीव्र होऊन त्याचे रूपांतर 'जवाद' चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकत जाऊन 4 डिसेंबरला आंध्र प्रदेश आणि ओडीशावर धडकेल असा अंदाज आहे. येत्या 24 तासात राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Tags:    

Similar News