युपी मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी करणारे काॅंग्रेस कार्यकर्ते जेरबंद !!!

Update: 2020-03-16 05:13 GMT

सीएएविरोधात (CAA) निदर्शनं करणाऱ्या आंदोलकांविरोधात उत्तरप्रदेश सरकारने केवळ दंगलीच्या व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल केले नाहीत, तर त्यांच्या छायाचित्रांसह सार्वजनिकरित्या पोस्टर्सही लावली. मात्र आता त्याच उत्तरप्रदेश सरकारने अशीच पोस्टर्स प्रदर्शित केल्याबद्दल दोन काॅंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

सुधांशू वाजपेयी आणि लालू कनोजिया ही अटक करण्यात आलेल्या काॅंग्रेस कार्यकर्त्यांची नावे आहेत. हजरतगंज पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर असलेली बदनामीकारक पोस्टर्स लावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. युपी मुख्यमंत्री अजय मोहन बिष्ट, उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्यासह संगीत सोम, संजीव बल्यान, उमेश मलिक, सुरेश राणा, राधामोहनदास अग्रवाल या भाजपा नेत्यांचा दंगलखोर असा उल्लेख करून, यांच्याकडून नुकसानभरपाई कधी वसूल होणार, असा सवाल "जनता मांगे जवाब" या शीर्षकाखाली पोस्टरवर करण्यात आला आहे.

सीएएविरोधक आंदोलकांविरोधात उप्र सरकारने पोस्टरबाजी केल्याची दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली व पोस्टर हटवण्याचे आदेश सरकारला दिले. त्या आदेशांची मुदत आज संपतेय. पण सरकारने पोस्टर हटवण्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय.

दरम्यान, समाजवादी पार्टीने कुलदीप सेंगर आणि चिन्मयानंदची पोस्टर्स झळकवली, तर आता काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर दंगलीचे आरोप करीत पोस्टर्स प्रदर्शन केलं. उप्र सरकारने त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतल्याने विरोधकांची सार्वजनिक बदनामी करण्याची खेळी सरकारच्याच अंगलट येताना दिसते आहे.

 

Similar News