हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे तुषार गांधींचं निमंत्रण रद्द

Update: 2020-02-07 09:56 GMT

पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधींवर आधारित कार्यशाळेतील तुषार गांधींचे भाषण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि पतीत पावन संस्थेच्या विरोधामुळे रद्द केल्याची माहिती प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी दिलीये. देशभरात सीएए आणि एनआरसीच्या वादामुळे वातावरण तापलेले असल्याने जास्त वाद वाढू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं प्राचार्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा...

रिव्हिजिटिंग गांधी या विषयावरील चर्चासत्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. गांधींजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त तुषार गांधी यांचं या चर्चासत्रात व्याख्यान होणार होतं. मात्र अचानक कुठलंही कारण न देता हे चर्चासत्र रद्द करण्यात आल्याचं तुषार गांधी यांना कळवण्यात आले. आयोजकांना धमकी मिळत असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा आरोप तुषार गांधी यांनी ट्विट करुन केला होता.

कार्यक्रमासाठी तुषार गांधी यांच्यासह अन्वर राजन यांनाही बोलावण्यात आले होते. दरम्यान तुषार गांधी यांना आपण स्वतंत्र व्याख्यानासाठी बोलावणार असल्याचं प्राचार्य एकबोटे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पतित पावन संघटनेने आम्ही तुषार गाधी यांच्या कार्यक्रमााठी कोणत्याही प्रकारचा विरोध केला नसल्याचं म्हटलं आहे.

Similar News