ट्विटरवर ट्रेन्डयुद्ध; #RejectFadnavisForCM नंतर MaharashtraNeedsDevendra चा ट्रेन्ड

Update: 2019-11-05 08:09 GMT

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे राज्यात सरकार कधी आणि कोणाचं स्थापन होणार. राज्यात आणि दिल्लीत त्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व घटना घडत असताना त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटत आहेत.

काल ट्विटरवर #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग ट्रेन्डींगला होता. या ट्रेन्डमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासह विरोधी पक्षांच्या समर्थकांसोबतच शिवसेनेच्या कर्यकर्त्यांचाही सहभाग मोठा होता. त्यामुळे काल या हॅशटॅगनी ट्विटर गाजवलं. काही तासांत काही हजार लोकांनी हा हॅशटॅग वापरत ट्विट केले.

‘मी पुन्हा येईन’ या फडणवीस यांच्या वाक्याची विरोधकांकडून खिल्ली उडवण्यात आली. गेल्या ५ वर्षांत फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते किती अकार्यक्षम होते हे सांगण्याचाही प्रयत्न झाला. आरे प्रकरणावरून अनेक युझर्सनी फडणवीस यांना ट्रोल केलं.

त्याला उत्तर म्हणून आज भाजपची आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडिया टीम कामाला लागली. आज सकाळपासून अनेक भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ ट्विट करण्यात सुरुवात केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात देवेंद्र फडणवीसच कसे योग्य आहेत हे सांगण्याचा या ट्रेन्डचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी कसे चांगले निर्णय घेतले, किती चांगली कामं केली हे सांगितलं जात आहे. या ट्रेन्डलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Similar News