रविवारी रेल्वे कर्फ्यू

Update: 2020-03-21 00:20 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर आता मुंबईत रविवारी लोकलही कमी प्रमाणात चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला एका परिपत्रकाद्वारे आदेश देण्यात आले असून गरजेनुसारच लोकल चालवण्याची सूचना करण्यात आली आहे. आवश्यकता असल्यास लोकल चालवण्याचे अधिकार त्या त्या झोनना देण्यात आले आहेत.

दरम्यान रविवारच्या जनता कर्फ्यूअंतर्गत लांब पल्ल्याच्या ३७०० रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री पासून ते रविवारी मध्य रात्रीपर्यंत एकही गाडी सुटणार नाही असं रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. तसंच रेल्वे स्टेशनवरील फूडप्लाझा, कँटिनही या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत. जगातील दुसरं सगळ्यात मोठं रेल्वे जाळं असलेल्या भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी स्वत: कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं असताना रेल्वेनं एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्यानं नजीकच्या काळात लॉकडाऊन करावे लागले तर त्याची ही चाचपणी तर नाही ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

Similar News