डेटिंग अ‍ॅपवरील झालेली ओळख तरुणीला पडली महागात; 73 लाख 59 हजारांची फसवणूक

Update: 2021-10-15 04:39 GMT

पिंपरी चिंचवड : आयटी अभियंता असलेल्या महिलेला डेटिंग अ‍ॅपवरील झालेली ओळख चांगलीच महागात पडली आहे. लग्नाचे अमिष दाखवून संबंधित महिलेची तब्बल 73 लाख 59 हजार 530 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबत पीडित 35 वर्षीय आयटी अभियंता महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

सिद्धार्थ रवी या व्यक्तीसह 18 बँक खाते धारकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सिद्धार्थ रवी याने संबंधित महिलेशी ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. त्या महिलेशी लग्न करण्याचे आणि भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखवले आणि तिची आर्थिक फसवणूक केली असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

सुरुवातीला सिद्धार्थ रवीने संबंधित महिलेला महागडे गिफ्ट पाठवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसरने पकडले असल्याचे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले. ही मोठी रक्कम सोडवण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी कारणे सांगत, वेगवेगळ्या बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर फिर्यादी महिलेला 73 लाख 59 हजार 530 रुपये भरण्यास भाग पाडले.दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्ज करून तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Tags:    

Similar News