ठाण्यातील गटई कामगारांच्या समस्या महिनाभरात सोडविणार - बच्चू कडू

Update: 2021-11-14 11:01 GMT

ठाणे// ठाणे शहरातील गटई कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत महापालिका आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. या संदर्भात आगामी महिनाभरात बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.

बच्चू कडू हे ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता गटई चर्मकार कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गटई कामगार, आदिवासी, तुर्फेपाडा येथील झोपडपट्टीवासीयांनी राज्यमंत्री कडू यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी हे आश्वासन दिले.

बच्चू कडू म्हणाले की, जयस्वाल हे आयुक्त असताना मी येथे आलो होतो. त्यावेळी ठाण्यातील दिव्यांगांच्या स्टॉलचा आणि घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला होता. 25 ते 30 टक्के दिव्यांगांना घर स्टॉलचे वाटप करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर चर्मकारांच्या समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा झालेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन चर्मकारांचे स्टॉल, पीच परवाना, आणि इतर समस्यांवर मार्ग काढण्यात येईल.

दरम्यान कंगणा राणावतच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, कंगणा राणावत हिला देशद्रोही ठरवून या देशातून तडीपार केले पाहिजे. जोपर्यंत ती नाक घासून माफी मागत नाही. तोपर्यंत तिला देशात स्थान दिलेच नाही पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान करणार्‍या कंगणाच्या विरोधात सर्व राज्यकीय पक्षांनी एकत्र येऊन तिच्यावर कारवाई केली पाहिजे.पण, आपल्या देशात अशा पद्धतीने राजकीय पक्ष एकत्र येत नाहीत, हे दुर्देवं आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या देशात अशा विषयांना अधिक महत्व दिले जात आहे. इथे मंदिर, मशिद, कंगणा अशा विषयांवर चर्चा घडविली जात आहे. पण, गरीबी, रोजगार, शेतकर्‍यांचे प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न यावर चर्चाच होत नाही, याचे वाईट वाटते, असेही ते म्हणाले.

त्रिपुरातील घटनेचे राज्यात पडसाद उमटले आहेत, यावर ते म्हणाले की, या देशात हेच वाईट आहे की एखाद्या राज्यात चांगले घडले तर या देशात ते घडत नाही. पण, वाईट घडले की सबंध देशात त्याच्या प्रतिक्रीया उमटतात.

Tags:    

Similar News