फेरीवाल्यांची मुजोरी सुरूच; महापालिका पथकाला धमकावले

Update: 2021-10-22 02:28 GMT

महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते , पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली. मात्र , तरीही फेरीवाल्यांची मुजोरी सुरूच आहे. घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटजवळ तीन दिवसांपूर्वी एका फेरीवाल्याने पालिकेच्या पथकावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आधी बोटे छाटली होती, आता मानच छाटू, अशी धमकी फेरीवाल्याकडून दिल्याची माहिती समोर आली आहे. पथकातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांनी धाडस दाखविल्याने हा फेरीवाला नरमल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाणे शहरातील रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी या मोहिमेवेळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर फेरील्याने चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाची बोटे छाटण्यात आली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने धकड मोहीम हाती घेतली आहे.

दरम्यान घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेटजवळील परिसरात रस्त्यावर फेरीवाले बसत आहेत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या घराच्या पाठीमागचा हा भाग आहे. पालिकेचे पथक तीन दिवसांपूर्वी या भागात कारवाई करण्यासाठी गेले असता तिथे नारळ विकणाऱ्या एका फेरीवाल्याने पथकावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न केला. साहाय्यक आयुक्तांची बोटेच छाटली होती, आता तुमची मानच छाटू, असे फेरीवाल्याने चाकू दाखवत पथकाला धमकावले. मात्र, पथकातील दोन ते तीन कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच फेरीवाल्याने शरण आला आणि चाकू खाली ठेवला. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Tags:    

Similar News