घरकुल घोटाळा प्रकरण: सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व आरोपी दोषी

Update: 2019-08-31 10:27 GMT

जळगाव घरकुल प्रकरणातील सर्व 48 आरोपींना आज धुळे न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. यामध्ये शिवसेनेचे माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह 48 जणांचा समावेश असून या सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. दरम्यान आरोपींच्या वकिलांना, तुम्हाला काही मांडायचे आहे का, असे विचारले असता त्यावर आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा या घरकुल घोटाळ्याची कोणताही संबंध नाही, ते आता वयोवृद्ध आहेत असेच म्हणत जोरदार युक्तीवाद केला. मात्र, सरकारी वकीलाने आरोपी असलेल्या सर्व नगरसेवकांनी कट-कारस्थान करून हा गुन्हा संगनमताने केला असा युक्तीवाद कोर्टासमोर केला.

काय आहे घरकुल घोटाळा ?

घरकुल घोटाळ्याचे कामकाज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे विशेष न्यायालयात स्थलांतरीत करण्यात आले होते. तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी घरकुल योजना राबविण्याचे ठरविले. घरकुल बांधण्यासाठी ‘हुडको’कडून कोटय़वधींचे कर्ज घेण्यात आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिनशेती परवानगी घेतली गेली नव्हती. ठेकेदाराला नियमबाह्य़ पध्दतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ देण्यात आले. इतकेच नव्हे, तर ठेकेदारास विविध सुविधा देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली.

महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर तीन फेब्रुवारी २००६ रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपी म्हणून सुरेश जैन यांच्यासह खांदेश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी यांचा समावेश करण्यात आला होता.

Similar News