तासगावातून अपहरण झालेले ते बाळ सापडले

Update: 2022-07-25 07:32 GMT

सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरात असणाऱ्या सरस्वती आनंद हॉस्पिटल मधून काल एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांनी २४ तासाच्या आत हे बाळ सुखरूप आपल्या आई वडिलांकडे सोपवले आहे. अपहरण केलेली महीला हि दोन दिवसापूर्वी या रुग्णालयात परिचारिका म्हणून रुजू झाली होती. याच महिलेने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर दवाखान्यात हर्षदा भोसले यांची प्रसूती झाली होती.

त्याच दरम्यान रुग्णालयात परिचारिका म्हणून स्वाती माने हि महिला देखील रुजू झालेली होती. यावेळी तिने रहिवाशी असल्याचे पुरावे कागदपत्रे काही दिवसांनी जमा करतो असे कळवले होते. हॉस्पिटल मधील एक क्रमांकाच्या वार्ड मध्ये असलेल्या बाळाच्या सुश्रुशेसाठी नातेवाईक होते. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून स्वाती हर्षदा व बाळाची काळजी घेत होती. नाव सांगितले नव्हते पण ती जुळेवाडीची असल्याचे व नातेवाईक तासगाव येथे राहत असल्याचे तिने सांगितले.

आम्ही तिला तू घरी का जात नाहीस हॉस्पिटलमध्येच का राहतेस असे विचारले यावेळी तिने माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही. नवऱ्याचा अपघात झालेला आहे. त्याची काळजी मुलगी घेत आहे. मला पैशाची गरज असल्याने मी रात्र दिवस हॉस्पिटलमध्येच काम करते व येथेच राहते असे सांगितले. रविवारी सकाळी आठ वाजता ती आमच्या जवळ आली व बाळाला आंघोळ घालायची आहे. माझ्याकडे ते बाळ द्या असे म्हणून बाळाला उचलून ते अंघोळ घालण्यासाठी घेऊन गेली. त्यावेळी आंघोळ घातल्यानंतर ते बाळ पुन्हा रूम मध्ये आणण्यात आले. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी ती पुन्हा आली व मला म्हणाली बाळाला डॉक्टरांना दाखवायची आहे.

यावेळी मी तिला डॉक्टर येणार नाहीत का असे विचारले असता तिने मला सांगितले डॉक्टर मॅडमची तब्येत बरी नाही त्यामुळे बाळाला मॅडमच्या घरी नेऊन दाखवते असे सांगितले. डॉक्टर अंजली पाटील यांचे घर दवाखान्याच्या वस्तीत असल्याने मी त्या नर्सला काही विरोध केला नाही. यानंतर ते बाळ घेऊन डॉ मॅडमच्या ऑफिस रूम मध्ये जाताना हर्षदाची सासू शोभा हीने पाहिले.

बराच वेळ झाले तरी बाळाला घेऊन ती न आल्याने सासूबाई यांना ती अजून का आली नाही असे विचारले. आमची चर्चा चालू असताना डॉक्टर अंजली पाटील त्यांच्या घरातून खाली हॉस्पिटलमध्ये येताना आम्हाला दिसल्या यावेळी मी त्यांना नर्स बाळाला घेऊन तुमच्याकडे आली आहे अर्धा तास झाले अजून ती खाली आली नाहीत. बाळ कुठे आहे असे विचारले. यावेळी डॉक्टर यांनी नर्स आमच्याकडे आली नाही म्हणाल्या. या नंतर बाळ व नर्सचा आणि शोध घेऊ लागलो. तासगाव पोलिसांना याची खबर देताच तपास सुरू झाला. दरम्यान तेथील एक दिवसाच्या बाळाला ताब्यात घेऊन स्वाती हॉस्पिटलमधून खाली आली. या बाळाला आपल्या काखेतील मोठ्या पर्समध्ये टाकून क्षणार्धात तिने बाळासह पोबारा केला. व ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली गेली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तातडीने चौकशी सुरु केली. सी सी टीव्ही फुटेज च्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवली. जिल्हाभर वायरलेस वरून संदेश देण्यात आला.दरम्यान, एलसीबीचे सागर टिंगरे यांना संबंधित महिला बाळासह शेनोली स्टेशनवर असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यांनी याबाबत तातडीने विटा येथील वाहतूक पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच विट्याचे वाहतूक पोलीस प्रसाद सुतार, अमोल जाधव व अन्य काहीजण तातडीने शेनोली स्टेशनकडे रवाना झाले. या पोलिसांनी संबंधित महिला व बाळाला ताब्यात घेतले. दरम्यान तासगावचे डीबी पथकही शेणोली स्टेशनवर पोहोचले.

सायंकाळी बाळासह सबंधित महिलेला तासगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिचे गाव खानापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. तीने हे कृत्य का व कोणासाठी केले, याची चौकशी सुरू आहे.एका दिवसाच्या बाळाचे अपहरण झाल्याचे समजताच सांगली जिल्हातील पोलीस झपाटल्यागत कामाला लागले. एसटी स्टॅन्ड, बाजारपेठा,रेल्वेस्टेशन, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे, लॉज,यांसह सारी ठिकाणी पोलिसांनी तपासायला सुरवात केली. गोपनीय बातमीदार तसेच सोशल मीडियावर मेसेज देत साऱ्यांना अलर्ट करत पोलीस जंग जंग पछाडत होते. तहान भूक विसरून तासगाव सांगली व विटा पोलिसांनी संयुक्त तपास करून या प्रकरणाचा अवघ्या आठ-नऊ तासात या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या दरम्यान कामावर ठेवत असताना त्या परिचारिकेकडून कोणतेही कागादपत्रे ओळखीचे पुरावे हॉस्पिटल प्रशासनाने घेतले नसल्याने सदर प्रकार ओढवला. अशा रुग्नालयामधून रुग्णांची लहान बाळांची सुरक्षा राम भरोसे असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे या रुग्णालय प्रशासनावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे.

Tags:    

Similar News