एसआरएतील घरविक्री आता ५ वर्षांनंतर करता येणार

महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास विधेयक 2023 मंजूर

Update: 2023-12-20 13:05 GMT

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) पुनर्वसन करण्यात आलेली घरे यापुढे पाच वर्षांनी विकता येणार आहेत. राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत पुनर्वसन करण्यात येणारी घरे यापूर्वी १० वर्षांनंतर विकण्याचा नियम होता. हा नियम बदलून ५ वर्ष करण्यात आला आहे. याबाबतचे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास ) (दुसरी सुधारणा) विधेयक 2023 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. याबाबत मुंबईतील लोकप्रतिनिधी व काही संघटनानी हमागणी लावून धरली होती.

मंत्री सावे म्हणाले, 19 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत एसआरएतील घरविक्री कालावधी 5 वर्ष करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. आज दोन्ही सभागृहात याबाबतचे विधेयक संमत करण्यात आले.

राज्यातील व प्रामुख्याने मुंबईतील सुमारे 2.50 लक्ष सदनिका धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात सदनिका धारकांच्या आधार क्रमांकाचे संलग्नीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आळा बसेल, अशी ही माहिती मंत्री सावे यांनी यावेळी दिली.

Tags:    

Similar News