राऊतांचा 'रोखठोक' घाव, सोनू सूदची मातोश्रीवर धाव !

Update: 2020-06-08 00:34 GMT

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याने रविवार रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी मंत्री अस्लम शेख त्याच्यासोबत होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरातील लेखातून सोनू सूदने राज्य सरकारचे अपयश दाखवण्यासाठी भाजपच्या मदतीने मजुरांना सहाय्य केल्याची टीका केल्यानंतर सोनू सूदने थेट मातोश्रीवर धाव घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.

या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी एक फोटो ट्विट करत सोनू सूद करत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोणताही गैरसमज नसून कोरोनामुळे त्रस्त लोकांना मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्याआधी सोनू सूदने मराठीमध्ये ट्विट करत, "स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं." त्या सर्व राज्य सरकारांचे आभार मानतो असंही ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान सोनू सूद मातोश्रीवर गेल्याची बातमी येताच संजय राऊत यांनी टोला लगावणारे एक ट्विट केले. "अखेर सोनू सूदला मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला, जय महाराष्ट्र!" अशा आशयाचे ते ट्विट होते.

सोनू सूदच्या समर्थनार्थ काँग्रेसचे मंत्री एकीकडे संजय राऊत यांनी सोनू सूदच्या मागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला तर दुसरीकडे शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी सोनू सूदच्या कामाचे कौतुक करणारे ट्विट करुन पाठिंबा दिला.

 

Similar News