माझ्यावरील हल्ल्यामागे शिवसेना पदाधिकारी- रोहिणी खडसे

Update: 2021-12-28 13:56 GMT

जळगाव  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घडवून आणला आहे असा आरोप रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला. "मला घाबरवण्यासाठी सोमवारी रात्री माझ्यावर हल्ला केला. पण मी घाबरणार नाही" अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.

"तीन टू व्हिलवर आलेल्या सात जणांनी हल्ला केला. त्यापैकी तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते. त्यातील एकाच्या हातात पिस्तूल, दुसऱ्याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. आप ण गाडीत ज्या बाजूने बसले होते. त्या बाजुने येऊन त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने लोखंडी रॉडने माझ्यावर हल्ला केला. ते मला जीवे ठार मारण्यासाठी आले होते" असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. पण अशा हल्ल्यांना आपण घाबरणार नाही, महिलांच्या सन्मानासाठी आपण लढत राहणार असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. बोदवड नगरपंचायत निवडणुकीपासून सुरु झालेल्या वैमनस्यातूनच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला, असा आरोपही त्यांनी केला. तर एकनाथ खडसे यांनी या हल्ल्यामागे आमदार चंद्रकांत पाटील असल्याचा आरोप केला.


Full View

Tags:    

Similar News