बीड जिल्ह्यात शिवसेना भाजपमध्ये जुंपली !

Update: 2019-10-02 06:09 GMT

गेवराई विधानसभेची जागा भाजपला सोडल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी शिवसेना गेवराईत भाजपाचे काम करणार नाही, अशी जाहीर भुमिका बदामरांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना घेतली होती. खांडे यांच्या या भुमिकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही तोडीस तोड उत्तर दिले असून तुम्ही नाही तर आम्हीही बीड विधानसभेत शिवसेनेचं काम करणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात शिवसेना भाजपचे चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यात गेवराई आणि बीड विधानसभेची मागणी शिवसेना पदाधिकार्‍यांनी केली होती. मात्र, जागा वाटपात फक्त बीडची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे गेवराईचे शिवसैनिक चांगलेच संतापलेले होते. या शिवसैनिकांना शांत करण्यासाठी जिल्हा प्रमुख कुंडलीक खांडे गेवराईत बदामरावांच्या घरी गेले होते. यावेळी 2 ते 3 हजार कार्यकर्ते जमा झाले होते. या कार्यकर्त्यांनी बदामरावांनी अपक्ष उभे राहण्याची गळ घातली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे म्हणाले, गेवराईचा एकही शिवसैनिक भाजपच्या स्टेजवर जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने राज्यभरात खळबळ उडाली. त्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ प्रदेश पदाधिकार्‍यांनी मुंबई येथे भाजपा शिवसेना महायुतीची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रभर भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले असतांना बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलीक खांडे हे शिवसेना गेवराई विधानसभेत भाजपाचे काम करणार नाही असे वक्तव्य कशामुळे करत आहेत? अशा प्रकारचे कोणतेही कृत्य बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी खपवुन घेणार नाही.

‘शिवसेना गेवराईत काम करणार नसेल तर भाजपाला देखील बीड विधानसभेत शिवसेनेचे काम करायचे का नाही हे ठरवावे लागेल’,

असा इशारा दिला आहे.

Similar News