सातारा : बस थांबत नाही, विद्यार्थ्यांनी अर्धा तास अडवला मुख्य रस्ता

Update: 2023-08-11 08:02 GMT

सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाठार स्टेशनमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. येथे ४० ते ५० गावावरून विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येत असतात. परिवहन खात्यातील काही आडमुठ्या चालक व वाहकांमुळे विद्यार्थ्यांना दररोज त्रास सहन करावा लागतो. काही वाहक व चालक महाविद्यालया जवळ असणाऱ्या एस.टी थांब्यावर महामंडळाच्या एसटी बसेस थांबवत नाहीत. विद्यार्थ्यांना अरेरावी करून एसटीमध्ये बसू देत नाहीत. याबाबत विद्यालयातर्फे वेळोवेळी डेपो मॅनेजर यांना पत्रव्यवहारही करण्यात आला होता. परंतु याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने आज अखेर विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सातारा - लोणंद हा मुख्य रस्ता विद्यार्थ्यांनी अडवला. यावेळी परिवहन खात्याच्या विरोधात विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी जोरदार घोषणा दिल्या. अचानक रस्ता रोको झाल्याने वाहन चालक व ग्रामस्थांच्यामध्ये बाचाबाची झाली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते रिपाईचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके सहभागी झाले होते. 

Tags:    

Similar News