गुगलने प्रसिध्द केले सरला ठकराल यांचं डूडल, जाणुन घ्या कोण आहेत सरला ठकराल?

Update: 2021-08-08 11:30 GMT

 पहिल्या भारतीय महिला वैमानिक सरला ठकराल यांची आज १०७ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगल इंडियाने त्यांचं एक डुडल प्रसिध्द केले आहे. गुगलने प्रसिध्द केलेले सरला ठकराल यांचे हे पोर्ट्रेट किर्ती जयकुमार यांनी रेखाटले आहे.

कोण होत्या सरला ठकराल?

सरला ठकराल विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला पायलट होत्या. १९१४ मध्ये जन्मलेल्या सरला यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी १९३६ मध्ये एव्हिएशन पायलट परवाना मिळवला आणि एक जिप्सी मॉथ सोलो उड्डाण केले. या वेळी त्यांना चार वर्षांची लहान मुलगी होती. सुरूवातीला परवाना मिळवल्यानंतर, त्यांनी चिकाटीने लाहोर फ्लाइंग क्लबच्या मालकीच्या विमानात १००० तास उड्डाण पूर्ण केले.




 


सरला यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पी.डी. शर्मा यांच्याशी लग्न केले. विशेष म्हणजे पी.डी. शर्मा यांच्या कुटूंबातील एक नाही, दोन नाही तर तब्बल नऊ सदस्य वैमानिक होते. त्यांनी सरला यांना प्रोत्साहन दिले. कराची आणि लाहोर दरम्यान उड्डाण करणारे विमानवाहक वैमानिकाचे परवाना मिळवणारे शर्मा हे पहिले भारतीय होते, तर त्यांच्या पत्नी सरला यांनी १००० तासांपेक्षा जास्त उड्डाण केल्यावर "ए" परवाना मिळवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला वैमानिक ठरल्या.

दुर्दैवाने, कॅप्टन शर्मा यांचा १९३६ मध्ये एका विमान अपघातात मृत्यू झाला. काही काळानंतर, सरला यांनी त्यांच्या व्यावसायिक पायलट परवान्याच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि नागरी प्रशिक्षण तात्काळ थांबवण्यात आले. एका मुलीला वाढवण्यासाठी आणि आपली उपजीविका चालवण्यासाठी सरला ठकराल यांनी व्यावसायिक पायलट बनण्याच्या त्यांच्या स्वप्नांना मुरड घातली. त्या लाहोरला परतल्या आणि मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं. जिथे त्यांनी बंगाल स्कूल ऑफ पेंटिंगमध्ये प्रशिक्षण घेतले आणि ललित कलांचा फाईन आर्ट्सचा डिप्लोमा केला.

भारताच्या फाळणीनंतर, सरला यांनी आपल्या दोन मुलींसह दिल्ली गाठली. दिल्लीला आल्यानंतर त्यांची भेट आर.पी. ठकराल यांच्याशी झाली. १९४८ मध्ये सरला यांनी आर. पी. ठकराल यांच्याशी लग्न केलं. सरला यांना मती म्हणूनही ओळखले जाते. एक यशस्वी व्यवसायी महिला, चित्रकार असलेल्या सरला यांचा २००८ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी मृत्यू झाला.

Tags:    

Similar News