ड्रोन कॅमेराची नजर चुकवून गोपिचंद पडळकर बैलगाडा शर्यत करुन दाखवणार का?

Sangli police action on bullock cart race organized by bjp Gopichand padalkar

Update: 2021-08-19 17:45 GMT

एकच छंद गोपीचंद असा नारा देत सांगली जिल्ह्यात गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यती होण्याची शक्यता आहे. प्रशासन सर्व शक्यता गृहीत धरून सज्ज असून कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यती होणार असल्याची गर्जना आमदार गोपीचंद पडळकर करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानासुद्धा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील झरे येथे 20 ऑगस्टला बैलगाडी शर्यत आयोजित करणार असल्याचं जाहीर केलं. आणि बैलगाडी शर्यत होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने कायदेशीर कारवाया सुरू केल्या..

सुरवातीला नाका-बंदी त्यानंतर झरे गावच्या आसपास परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर या परिसराततील रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली. स्पर्धेचे ठिकाण आणि संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, तरीही बैलगाडी शर्यती या गनिमीकाव्याने अन्य ठिकाणी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यासाठी 15 बैलगाड्या अज्ञात स्थळी ठेवल्याची सुद्धा चर्चा आहे. सांगली च्या आसपास जिल्ह्यातून भाजप नेते बैलगाड्या घेऊन झरेच्या दिशेने निघाले आहेत. अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

माजी मंत्री सदाभाऊ खोत येथील बैलगाडा शर्यतीच्या मैदानात आले होते. पोलीस बळाचा वापर करून स्पर्धा चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा मावळ करण्याचा सरकारचा उद्देश दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाघाची डरकाळी कुठे गेली, बैलगाडी शर्यत सुरू करतो. मुख्यमंत्री आत्ता झरे येथील बैलगाडी शर्यतीला विरोध का करीत आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात बैलगाडी शर्यतीला फार मोठा इतिहास आहे किमान याचे भान ठेवून गरजेचं होतं, झरे मध्ये पोलीस बळाचा वापर करताना तुम्हाला आपल्या भागातील परंपरेचं तर भान ठेवणं गरजेचं होतं अशी टीका माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील झरे गावातील आणि बैलगाडी शर्यत मैदान आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांच्या ड्रोनची नजर आहे. झरे गावा सहित अन्य नऊ गावात संचारबंदी आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे.

मात्र, त्याबरोबरच झरे परिसरावर ड्रोनच्या सहाय्याने पोलीस वॉच सुरू आहे. मात्र, उद्या होणाऱ्या बैलगाडी शर्यतीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी झरेसह नऊ गावांमध्ये संचारबंदी व गोपीचंद पडळकर यांनी शर्यत घेणारच या घोषणेमुळे गावाला पर्यटनाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे उद्या शर्यत होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News