सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्या, गूढ उलगडलं

Update: 2022-06-27 14:21 GMT

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेने राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले माणिक वनमोरे आणि त्यांचे शिक्षक असलेले भाऊ पोपट वनमोरे यांनी आपल्या कुटुंबातील ९ जणांसह सामूहिक आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती.

या सामूहिक आत्महत्या प्रकरणाने पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते. पण आता एकाच कुटुंबातील या ९ जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकऱणात २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी १९ जणांना अटक करण्यात आली होती. पण आता अटक केलेल्या दोन जणांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 9 जणांची हत्या करण्यात आली आहे. त्यांना जेवणातून विषारी औषध दिले गेल्याचे समोर आले आहे.

डॉ. वनमोरे आणि त्यांचे भाऊ या दोघांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. ते कर्ज त्यांनी खसागी सावकाराकडून घेतले होते, असेही सांगितले जात होते. याच सावकारांच्या जाचाला कंटाळून या सगळ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. पण त्यांना विषारी औषध का दिले गेले, यामागे आणखी काही कारण आहे का याची माहिती समोर आलेली नाही.

Similar News