फडणवीसांच्या त्या मुलाखतीला पवारांच्या मुलाखतींमधून उत्तर

Update: 2020-07-07 02:03 GMT

राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. पण ऐनवेळी शरद पवारांनी भूमिका बदलली असा गंभीर गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एका मुलाखतीत केला आहे.

तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय प्रक्रियेतला गोंधळ चव्हाट्यावर आलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केलेले आहे.

" देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल..

@PawarSpeaks चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले"

असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. चीनबाबत शरद पवार यांनी काँग्रेसच्या अगदी उलट भूमिका घेतलेली आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद हा देखील सध्या चर्चेचा विषय आहे. या सर्व मुद्द्यांवर शरद पवार नेमके काय बोलले आहेत, त्याबाबत आता उत्सुकता निर्माण झालेली आहे.

एकंदरितच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीमधून गौप्यस्फोट केलेले आहे त्याला शरद पवार आपल्या मुलाखतीमधून काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मुलाखत कधी प्रकाशित केली जाणार आहे याची माहिती मात्र संजय राऊत यांनी सध्या दिलेली नाही.

Similar News