आजारी साखर कारखान्यांचा लिलाव, तपासात रोहित पवारांच्या फर्मचं नाव

Update: 2020-01-29 10:43 GMT

राज्य सहकारी बँकेतील कर्ज घोटाळा आणि आजारी सहकारी साखर कारखान्यांच्या लिलाव आणि खरेदीत गैरप्रकार झाल्याच्या आरोपप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब उघड झालीये. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार आजारी सहकारी साखर कारखान्यांच्या लिलाव आणि खरेदी प्रक्रियेतील एका व्यवहारातील अनियमिततेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुतणे रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती एग्रो लिमिटेड या फर्मचे नाव आले आहे. अजित पवार हे २००७ ते २०११ या काळात राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. या काळात झालेल्या गैरव्यवहारांबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि ईडीने अजित पवारांवर गुन्हेही दाखल केलेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१२ मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्यानं कर्ज थकवल्यानं राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) या कारखान्याचा लिलाव केला. या लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या बारामती एग्रो लिमिटेडनं हा साखर कारखाना ५० कोटी २० लाख रुपयात खरेदी केला. या लिलावात हायटेक इंजिनिअरिंग कार्पोरेशन आणि समृद्धी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन इतर कंपन्याही सहभागी झाल्या होत्या. नियमाप्रमाणे या तिन्ही कंपन्यांनी लिलावासाठी ४.५९ कोटी रुपये अनामत रक्कमही भरली होती. पण पोलीस तपासानुसार बारामती एग्रो लिमिटेड कंपनीने हायटेक इंजिनिअरिंग या कंपनीच्या खात्यात २५ ऑगस्ट २०१२ रोजी ५ कोटी रुपये भरले. त्यानंतर दोन दिवसांनी या कंपनीने राज्य सहकारी बँकेत कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलावात सहभाग होण्यासाठी अनामत रक्कम जमा केली.

इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भात बारामती एक्स्पोर्टसचे सीईओ रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा अशाप्रकारे तपासात काही माहिती पुढे आल्याचं तपास यंत्रणांनी आम्हाला आतापर्यंत कळवलेलं नाही असं सांगितलं. ज्या प्रकरणाबाबत आपण प्रश्न विचारत आहात त्याचा तपास अजूनही सुरू आहे आणि ते न्यायप्रविष्ट असल्यानं बोलणार नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिलीये. तसंच तथ्यांचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचा दावाही त्यांनी केलाय. राज्य सहकारी बँकेशीही इंडियन एक्स्प्रेसनं संपर्क साधला पण बँकेतर्फे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कोर्टानं गेल्यावर्षी राज्य सहकारी बँकेतील घोटाळाप्रकरणी अजित पवारांसह ७० संचालकांवर गुन्हे दाखल कऱण्याचे आदेश दिले होते.

बारामीत एग्रोच्या वार्षिक अहवालानुसार या कंपनीनं जेव्हा कन्नड सहकारी साखर कारखाना लिलावात विकत घेतला तेव्हा अजित पवारही या कंपनीचे शेअर होल्डर होते. हा कारखाना ५० कोटी २० लाखांमध्ये विकत घेतल्यानंतर बारामती एग्रोने २०१३मध्ये राज्य सहकारी बँकेकडे या कारखान्याच्या मालमत्तेपैकी काही हिस्सा गहाण ठेवत १२० कोटी रुपये उभारले होते. काही सहकारी साखर कारखान्यांची क्षमता नसतानाही राज्य सहकारी बँकेनं या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Similar News