पुण्यामधील तरुणांचा डीपी असलेला पठाण चाचा नक्की कोण आहे…?

Update: 2021-04-15 06:42 GMT

कोरोना मानवतेवर आलेलं असं संकट की ज्या संकटात आपलाच माणूस आपल्यापासून दूर जातो. कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटला जायंचं म्हटलं तर अम्ब्युलन्स मिळत नाही. अशा परिस्थिती कोणीही मदतीला ही येत नाहीत. त्यातच पुण्यासारख्या शहरात रस्त्यावर लोक मरुन पडले तरी कोणी पाहत नाही. अशी परिस्थिती आहे. मात्र, याला काही लोक अपवाद असतात… पुण्यातील पठाण चाचा…

आपण या समाजामध्ये नागरिक म्हणून जगत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो. हे आपण अनेकदा ऐकलं आहे. परंतु या संदेशाला आचरणात आणणारे फार क्वचीत लोक खरंतर पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात सध्याची परिस्थिती पाहता असा अनुभव अगदी दुर्मिळच येतो.



संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर ओढवणारा ताण आणि या सगळ्यांमध्ये जनतेला योग्य संदेश देणारे पुण्यातील पठाण चाचा…


पुणे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्यामुळेच त्याचा परिणाम आरोग्य यंत्रणांवर होत आहे. कोरोना बाधित रुग्णांना या समस्येचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे आणि उपचारासाठी दवाखान्यामध्ये जाण्याकरिता रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. ही गोष्ट जेव्हा पठाण चाचाच्या लक्षात आली. तेव्हा चाचांनी कसलाही विचार न करता आपली रिक्षा या रुग्णांच्या सेवेत दाखल केली. विशेष बाब म्हणजे ही सेवा देत असताना या चाचा रुग्णांकडून कुठलेही शुल्क घेत नाही. या सेवेसाठी त्यांनी आपले 8888343766 , 8888883298. हे भ्रमणध्वनी क्रमांक रुग्णांच्या सेवेसाठी दिले आहेत.


 केव्हाही कुठल्याही गरजू रुग्णाने संपर्क साधल्यास चाचा थेट त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य निशुल्क करत आहेत. पठाण चाचा सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्य देखील करीत आहेत. या कार्याबद्दल आम्ही काकांशी बातचीत करून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.


 हे कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? हे काकांना विचारले असता.. "मागच्या वर्षी माझ्या मित्राच्या आईला कोरोना झाला होता त्यावेळी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याकरिता रुग्णवाहिका मिळाली नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हाच मी ठरवलं आपण जरी आपल्या जिवलग मित्राच्या आईचे प्राण वाचवू शकलो नाही… तरी आता आपली रिक्षा अनेक रुग्णांच्या सेवेत दाखल करून त्यांना मदत करायची. परंतु सुरुवातीला मला या कामासाठी माझ्या घरच्यांनी कडाडून विरोध केला. परंतू तो विरोध पत्करून मी माझं कार्य सुरूच ठेवलं. कारण हे कार्य करत असताना मी परमेश्वराची सेवा करतो. असं मला वाटतं आणि यामधून कोणालाच न मिळणारा आनंद माझ्या वाट्याला येतो. यासारखं दुसरं भाग्य नाही." असं सांगताना चाचांना अश्रू अनावर झाले.

पठाण चाचांनी ज्या काही लोकांना मदत केली त्यांच्यापैकी काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.राहुल जाधव सांगतात "चाचाचा क्रमांक मला मिळाल्यानंतर मला विश्वास बसला नाही परंतु मी खरंच ज्या वेळेला मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा काका मला मदत करायला आले आणि त्यांनी कुठलेही पैसे न घेता मला मदत केली मी त्यांचा मनापासून आभारी आहे". असं राहुल यांनी सांगितलं.

चैत्राली बोबडे सांगतात.. "मी चाचांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला त्वरित मदत केली खरंतर आजच्या या युगात असे लोक मिळणं फार कठीण असतं परंतु राजकारण करणाऱ्या लोकांनी अशा व्यक्तींचा आदर्श घ्यायला हवा असं मला वाटतं. जर सर्वसामान्य लोक एवढे चांगलं कार्य करू शकतात तर मग हे मोठे मोठे राजकारणी लोक खालच्या पातळीवर का जातात हेच मला कळत नाही. मी काकांच्या रूपात मिळालेल्या या देवदूताचे आभार मानते". असं चैत्राली यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.

गौरी पवार सांगतात त्यांच्या सासूबाईंना खूप त्रास जाणवत होता. मी पठाण चाचांना रात्री फोन केला आणि काका त्यांची रिक्षा घेऊन आम्हाला मदत करायला आले. अगोदर वाटलं कोणी येणार नाही. पण आशेचा किरण म्हणून फोन केला. त्यांनी आम्हाला रुग्णालयात नेलं. त्याचबरोबर रात्रभर आमच्यासोबत ते तिथेच थांबले. हे चाचा खरच खूप चांगलं काम करत आहेत. त्यांच्या या उपकारामुळे आज माझी आई माझ्यासोबत आहे.अशा भावना गौरींनी व्यक्त केल्या आहेत.

गौतमी चव्हाण सांगतात मी स्वतः आजारी होते आणि मी चाचांना फोन केला असता, त्यांनी लगेच मला माझ्या घरी येऊन रुग्णालयात दाखल केले. मी त्यांना विचारलं चाचा तुम्हाला आमच्यासारख्या रुग्णांना मदत करत असताना भीती वाटत नाही का? त्यावेळी ते म्हणाले, त्यामध्ये भीती कसली त्याची सेवा करत असताना आपण कुठलीच भीती बाळगत नाही. मग मी तर त्याची सेवा करत आहे. चाचांचे हे शब्द ऐकून मलाही नवलच वाटलं काका खरंच खूप चांगलं काम करत आहेत. आजचा काळात असे लोक खरोखर पाहायलाच मिळत नाही. असं गौतमी ने म्हटलं आहे.

प्रशांत कनोजिया सांगतात मी help writer या समूहामध्ये काम करतो. मला अनेक रुग्णांचे फोन येतात. मग मी त्यांना पठाण काकांचा नंबर देतो. नंतर पठाण काका त्यांना मदत करतात अनेक रुग्णांनी मला फोन करून पठाण काका यांचा चांगल्या कार्याची माहिती दिली आहे. मी या कामाच्या मोबदल्यात काकांना अनेक वेळेला पैसे देऊ केले आहेत.

परंतु पैसे घेण्यासाठी या काकांचा नेहमी नकार असतो. खरंच आजच्या काळात देखील माणुसकी शिल्लक आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो काकांच्या कार्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दही नाहीत. पठाण काका आजच्या काळातल हिरो आहेत. त्यामुळे आमच्यातील अनेक लोक पठाण काकांचा डीपी ठेवत आहे. त्यामुळं कोणी विचारलं तर आम्ही सांगतो. कोणी त्यांना काका म्हणत तर कोणी चाचा... हे सर्व रुग्ण गाडीच्या खाली उतरल्यानंतर 'चाचाला आपकी उमर लंबी हो' 'चाचा आप सौ साल जिओ' असं म्हणतात तेव्हा चाचाचा आनंद गगनात मावेनासा होतो. आज कोरोना संकट मोठं आहे. हे आपण सगळे जाणतो. मात्र, या संकटापेक्षा आपली इच्छा शक्ती मोठी असेल तर आपण या संकटावर नक्की मात करु अशी शिकवण आपल्याला पठाण चाचा देतात.

Tags:    

Similar News