खासदार अनंतकुमारांवर कारवाई का नाही?

Update: 2020-02-03 11:55 GMT

भारताचा स्वातंत्र्य संग्राम हे ब्रिटीश सरकार पुरस्कृत नाट्य होतं असं अत्यंत धक्कादायक विधान भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलंय. बंगळुरूमध्ये एका जाहीर सभेत त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. एवढंच नाहीतर महात्मा गांधी यांचा सत्याग्रह हासुद्धा एक ड्रामा होता, असंही ते बरळले आहेत.

या सभेत बोलताना हेगडे यांनी म्हटले आहे की, “कुणीतरी सत्याग्रह केला म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं काही लोक सांगत असतात. पण ब्रिटींशांनी नैराश्यातून आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. इतिहासाचं पुस्तक वाचताना माझं रक्त खवळतं आणि अशा लोकांना आपल्या देशात महात्मा म्हटलं जातं.”

एवढंच बोलून हे महाशय थांबलेले नाहीत, तर देशाचा स्वातंत्र्यलढा हे निव्वळ ढोंग होतं असंही ते म्हटलेत. ते म्हणतात, “या नेत्यांपैकी कुणी पोलिसांची एक लाठीसुद्धा कधी खाल्ली नाही. स्वातंत्र्यलढा हेच मुळात ब्रिटीशांनी पुरस्कृत केलेलं ढोंग होतं” अशी मुक्ताफळंही त्यांनी उधळली आहेत.

दरम्यान वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर कर्नाटक भाजपनं हेगडे यांच्या मतांशी पक्ष सहमत नसून महात्मा गांधींविषयी आम्हाला आदर आहे आणि त्यांच्याविरोधातील अशी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, "महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्यातून हेगडेंची बौद्धीक दिवाळखोरीच दिसून येते. ब्रिटिशांची दलाली करून स्वातंत्र्य लढ्याला विरोध करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढा नाटक वाटू शकतो. यांच्या पूर्वजांनीही ब्रिटिशांशी हात मिळवून स्वातंत्र्यलढ्याला कायम विरोधच केला, हे खरे भाजपाचे रूप आहे." अशी टीका कॉंग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Similar News